सातारा : ठोसेघर येथे भेकर व चौसिंगा या वन्य प्राण्यांची शिकार करून त्याची पार्टी करणाऱ्या तिघांच्या वनाधिकाऱ्यांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून एक एअर गन, एक सिंगल बोअर बंदूक, जिवंत काडतुसे, चाकू , कोयता व वेगवेगळ्या ठिकाणी लपविले मांस, कातडे वन अधिकाऱ्यांनी हस्तगत केले. यातील युवराम निमन हा आसाम रायफल्समधील रायफलमॅन आहे.
युवराज निमन (रा. श्रीवास्तू अपार्टमेंट, माची पेठ, सातारा), नारायण सीताराम बेडेकर, विठ्ठल किसन बेडेकर (दोघेही, रा. ठोसेघर, ता. सातारा) अशी वनविभागाने अटक केेलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, वरील संशयितांनी सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ठोसेघर येथे भेकर व चौसिंगा या वन्यप्राण्यांची शिकार केली. त्यानंतर शिकार केलेले प्राणी त्यांनी घरी आणले. याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी साताऱ्यातील श्री वास्तू अपार्टमेंटमधील निमनच्या घरी छापा टाकला. तेथे भेकर व चौसिंगा या दोन वन्यजीव प्राण्याचे मुंडके व भेकराचे मांस, पायाचे खूर सापडले.
युवराज निमन याने ही शिकार ठोसेघर येथे नारायण बेडेकर, विठ्ठल बेडेकर यांना सोबत घेऊन केल्याचे चौकशीत सांगितले. नारायण याच्याकडे असलेल्या सिंगल बोअर बंदुकीने या प्राण्यांची शिकार करण्यात आली आहे. तिन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर वनकायद्यानुसार वन्य प्राण्यांच्या शिकार प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. शिकारी हे सराईत असून त्यांनी या पूर्वी असे वेगवेगळे गुन्हे केल्याची शक्यता आहे. पुढील तपास सहायक वनसंरक्षक सुधीर सोनवले हे करीत आहेत. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सहायक वनसंरक्षक सुधीर सोनवले, वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण, वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे आदी सहकाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.
साताऱ्यातील बडी हस्तीही मारणार होती ताव...
नारायण यांनी सर्व मांस स्वतःच्या घरात एका पिशवीत घालून घरामागील खोलीत शेणीच्या खाली लपवले होते. हे मांस त्याने साताऱ्यातील कोणा बड्या हस्तीला देण्यासाठी लपवून ठेवले होते. रात्री हे मांस घेऊन तो त्यांच्या घरी जाणार होता, असे त्याच्या चाैकशीत समोर आले आहे. मात्र, बडी हस्ती कोण, हे मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले नाही.