डोंबिवली - रेल्वे प्रवासात मोबाइल चोरीच्या घटना वाढत असून अशीच घटना डोंबिवलीतील रहिवासी व्रशभ शहा या प्रवाशाच्या बाबतीत २३ जून रोजी घडली होती. त्या घटननंतरच त्याच तक्रारदाराच्या बँक खात्यातून काही वेळातच २३ हजार रुपये अन्य खात्यात वळती झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले, त्याने सतर्कता दाखवत तातडीने डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दिली, पोलिसांनी सर्व धागेदोरे तपासून काढत मोबाइल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या पत्नीला मुंब्रा येथून अटक केली असून तिचा पती फरार आहे.
या घटनेसंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी सांगितले की, शहा यांनी तक्रार देताच त्यांचा मोबाईल मुंबई ते डोंबिवली प्रवासात गहाल झाला असल्याचे त्याना डोंबिवलीत उतरल्यावर समजले, त्याच दरम्यान त्यांच्या खात्यातून त्यांची २३ हजार रुपये रक्कम कमी झाल्याचे त्याना समजले, त्यानुसार त्यांचे खाते असलेल्या कॉसमॉस बँकेत जाऊन पैसे कोणत्या अकाउंटला वळती झाले ते बघितले, त्यांनुसार एसबीआय मध्ये कासीम शेख या व्यक्तीच्या पत्नीच्या म्हणजे शबिना शेख हिच्या खात्यावर ते वळती झाल्याचे निदर्शनास आले, बँकेतून पोलिसांनी खातेदाराचा पत्ता घेतला, तो मुंब्रा येथील असल्याचे समजले, त्यानुसार तेथे जाऊन घरातून शबिना हिस पोलिसांनी अटक केली, चोर पती मात्र अद्याप फरार असून वळती केलेले पैसे आणि मोबाइल देखील त्याच्याकडेच असल्याचे पवार म्हणाले. शबिना हिला शनिवारी अटक केली असून ३० जूनपर्यंत तिला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आता तिच्या सांगण्यानुसार दिवा, मुंब्रा, ठाणे आदी ठिकाणी तिचा फरार पती कासीम याचा शोध पोलीस घेत असून सोमवार संध्याकाळ ५ वाजेपर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता. नागरिकांनी रेल्वे प्रवासात सतर्क असावे, तसेच बँकेचे तपशील मोबाइल मध्ये वैगरे ठेवू नयेत. या घटनेत बँकेचा तपशील आणि खात्याचा पासवर्ड आदी गोपनीय माहिती ठेवण्यात आली होती, त्यामुळे मोबाइल चोरल्यानंतर खात्यातून रक्कम देखील चोरली गेली. आता त्याचा तपास सुरू असून मुद्देमाल मिळवणे हे पोलिसांमसमोर आव्हान आहे.