नालासोपारा : महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र खेचून जबरी चोरी करणाऱ्या आरोपी पती-पत्नीला बोळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक करून गुन्ह्याचा उलगडा केला आहे. विरार येथे राहणारी एक महिला २१ ऑक्टोबर राेजी दुपारी घरी पायी चालत जात होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या एक महिला व पुरुषाने त्यांच्या गळ्यातील ६३ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते.
याप्रकरणी बोळींज पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. घटनास्थळावरील तसेच जवळपास ४० ते ५० सीसीटीव्ही कॅमेरे व तांत्रिक माहितीच्या आधारे दिनेश पारदले (३८) आणि त्याची २० वर्षीय पत्नी यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यावर पोलिसांनी त्यांना अटक करून ६३ हजारांचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली १ लाख रुपये किमतीची दुचाकी हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला.