तेल्हारा : तालुक्यातील वाडी अदमपूर येथील ताराचंद बजाज यांच्या राहत्या घरी पती-पत्नीने २० सप्टेंबरच्या रात्री २ वाजताच्या सुमारास धारदार शस्त्र व पिस्तूलचा धाक दाखवून घरमालकाला बांधून दरोडा टाकून १.७८ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. तेल्हारा पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून दोन्ही आरोपींना इतर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने काही तासांच्या आत अटक केली.वाडी अदमपूर येथील ताराचंद नारायणदास बजाज (६३) यांच्या राहत्या घरी आरोपी अस्लम शहा ऊर्फ अहमद शहा यासिन शहा (२१) व मुस्कान बी अस्लम शहा (२०) रा. इंदिरा नगर, तेल्हारा हल्ली मुक्काम शिवणी, अकोला या दोघांनी रात्री १२ वाजताच्या सुमारास बजाज यांच्या घरात दरवाजा तोडून प्रवेश केला. घरात वीज पुरवठा खंडित असल्याने ते काही काळ स्वयंपाक खोलीमध्येच बसून होते. वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर दोघांनी ताराचंद बजाज यांना शस्त्र व पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्या तोंडावर चिकटपट्टी लावली. त्यांना दोरीने बांधून बेदम मारहाण केली. नंतर घरातील नगदी १२ हजार रुपये, सोन्याची पोथ, पट्टा पोथ, दोन अंगठ्या, कानातील कर्णफुले, साखळ्या, चेन, मोबाइल असा एकूण १.७८ लाखांचा माल लंपास केला. घटनेची माहिती तेल्हारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना मिळाली. त्यांनी तपास चक्रे फिरवित याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुर्डे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांना तातडीने माहिती दिली असता सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली. आरोपी ज्या दिशेने पळ काढला, त्या दिशेने नाकेबंदी असल्याने आरोपींना पकडण्यात यश आले. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत राउंड व धारदार शस्त्र, दुचाकी वाहन तसेच मौल्यवान वस्तूंसह ५ लाख ७० हजारांचा माल हस्तगत करून दोघांनाही अटक केली. आरोपीने मुद्देमाल हल्ली मुक्काम असलेल्या अकोलानजीकच्या शिवणी येथे ठेवून घटनास्थळी मोबाइल राहिला असता मोबाइल घेण्यासाठी परत आल्याने आरोपींचा गेम फसला. (तालुका प्रतिनिधी)
बंदुकीच्या धाकावर पती-पत्नीने टाकला दरोडा; काही तासातच अडकले पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 8:02 PM