राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील मासलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील भोजपूर गावात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. एसपी बृजेश ज्योती उपाध्याय यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. एफएसएल पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. हत्येमागची कारणे अद्याप समोर आलेली नाहीत.
करौली डीएसपी अनुज शुभम यांनी सांगितलं की, उत्तर प्रदेशातील किरावली भागातील सांथा गावात राहणारा विकास (२२) मंगळवारी दुपारी एक वाजता पत्नी दीक्षा (१८) हिच्यासोबत कारने कैला देवीच्या दर्शनासाठी आला होता. कैला देवीचे दर्शन घेऊन परतत असताना रात्रीच्या वेळी मासलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोजपूर गावाजवळ रस्त्यात कोणीतरी पती-पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. विकासला दोन गोळ्या लागल्या आहेत तर त्याची पत्नी दीक्षा हिला एक गोळी लागली आहे.
रस्त्यावरून जात असलेल्या ग्रामस्थांनी कारमध्ये एक पुरुष आणि एक महिला मृत असल्याचे पाहून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच मासलपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडून घटनेची माहिती घेतली. दीक्षाचे वडील सियाराम यांनी सांगितलं की, आणखी काही लोकही विकास आणि दीक्षासोबत कारमधून आले होते. मात्र हे लोक कोण आहेत याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
डीएसपी म्हणाले की, कैला देवीसह अनेक ठिकाणांहून सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात आले आहेत. यासोबतच एफएसएलने घटनास्थळावरून पुरावेही गोळा केले आहेत. पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. विकास आणि दीक्षा यांचं ८ ते दहा महिन्यांपूर्वीच लग्न झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.