ठाणे- श्रीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्या केलेल्या अनिता भीमराव व्हावळ (३४, रा. वर्तकनगर, ठाणे) या महिला पोलीस नाईकचा पती विजय झिने (३८, रा. दोस्ती कॉम्पलेक्स, वर्तकनगर, ठाणे) याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून तिचा छळ होत होता, अशी तक्रार तिच्या भावाने श्रीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
महिला पोलीस नाईक अनिता आणि विजय यांचा विवाह १६ वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना १५ आणि ११ वर्षांच्या दोन मुली आहेत. मोठी दहावी तर धाकटी सहावीच्या वर्गात शिकते. या दाम्पत्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सतत भांडणे होत होती. अनेक वेळा नातेवाइकांनी मध्यस्थी करुन त्यांची भांडणे सोडवली होती. पती विजय हा नेहमीच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करीत असे. तिला शिवीगाळ करुन मारहाणही करीत असे. तिला तो मानसिक त्रास देत होता.
आत्महत्येच्या आदल्या दिवशी रात्री त्यांच्यात चांगलेच कडाक्याचे भांडण झाल्याची माहिती त्यांच्या एका मुलीने पोलिसांना दिली. पती विजय याच्याकडून वारंवार होत असलेल्या छळामुळे आणि चारित्र्याच्या संशयामुळेच तिने आत्महत्या केल्याचा आरोप अनिता हिचा भाऊ विशाल वाव्हळ (३०, रा. चिंचवड, पुणे) याने केला. पतीच्या त्रासाला कंटाळून आपली बहीण अनिता हिने आत्महत्या केली असून तिला पतीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत कलम ४९८ अ, ३०६ प्रमाणे श्रीनगर पोलीस ठाण्यात १६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला. दरम्यान, अनिता हिने पोलीस ठाण्यातील महिला कक्षातच आत्महत्या केल्याचे १६ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास उघड झाले. रात्री उशिरा ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. बुधवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी -याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा तपास नि:पक्षपातीपणे होण्यासाठी तसेच पोलीस ठाण्यातच महिला पोलीस अंमलदाराचा मृत्यू झाल्यामुळे या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाकडे सोपविला आहे. आधी आकस्मिक मृत्यूचा तपास वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली रासकर यांच्याकडे होता. आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या या गुन्ह्याचा तपास मध्यवर्ती शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी हे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.