ठाणे : दोन वर्षांपूर्वी पत्नीचा खून करून मृतदेह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका खिंडीत ब्रिजच्या बाजूला फेकून बांगलादेशात पसार झालेला आरोपीस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने मंगळवारी अटक केली आहे. त्याला पालघरच्या वालीव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पत्नीचा खून करून २०१७ मध्ये बांगलादेशात पसार झालेला महाबुबुर शेख हा पुन्हा भारतात आला असून तो ठाणे रेल्वेस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे पोलीस हवालदार संभाजी मोरे यांना मिळाली होती. त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक, कैलास सोनवणे, हवालदार मोरे, रवींद्र पाटील, नरसिंग महापुरे आदींच्या पथकाने ३१ डिसेंबर २०१९ रोजी सॅटिसखाली सापळा रचून शेखला ताब्यात घेतले. त्याने डिसेंबर २०१७ मध्ये पत्नी पॉलीचा गळा दाबून खून करून तिचा मृतदेह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तातिवली खिंडीत ब्रिजच्या बाजूला फेकला होता, अशी कबुलीही त्याने दिली. त्याने केलेल्या खुनानंतर त्याच्या पत्नीच्या मृतदेहाचा सांगाडा दोन वर्षांनी म्हणजे २१ मार्च २०१९ रोजी पालघरच्या वालीव पोलिसांना मिळाला. त्यामुळे याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेऊन त्याला आता वालीव पोलिसांच्या स्वाधीन केले.
जुन्या गुन्ह्यांच्या चौकशीचे आदेशगेल्या तीन वर्षांतील खून, मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलिसांना कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी दिले होते. पालघरमध्ये २०१७ मधील दोन, २०१८ मधील सहा आणि २०१९ मधील आठ खुनांच्या गुन्ह्यांचा छडा लागलेला नाही. ठाणे शहर पोलिसांमुळे आता २०१७ मधील दोनपैकी एका खुनाचा छडा लागल्याने आता ही संख्या एकवर आली आहे.