भोपाळ: मध्य प्रदेशच्या अनुपपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका आईनं स्वत:च्या दीड वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे. कोतमा येथील माइंस वसाहतीत ही घटना घडली. पतीला पत्नीच्या चारित्र्यावर शंका होती. त्यामुळे त्यानं पत्नीला दीड वर्षांच्या मुलाची डीएनए चाचणी करण्यास सांगितलं. मुलावरून पती-पत्नीत दररोज वाद व्हायचा. त्यामुळे वैतागलेल्या महिलेनं स्वत:च्या दीड वर्षांच्या मुलाची गळा आवळून हत्या केली. पोलीस चौकशीत महिलेनं गुन्ह्याची कबुली दिली आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिषेक राजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीत पंडित बिजुरी आणि छत्तीसगढमध्ये कंत्राटदार म्हणून काम करतो. त्याची पत्नी पुष्पा आणि २ मुलं अनुपपूरमध्ये राहतात. लहान मुलगा अविनाशवरून संजीत आणि पुष्पामध्ये वाद व्हायचा. अविनाशला संजीव स्वत:चा मुलगा मानायचा नाही. काही दिवसांपासून याचवरून दोघांमध्ये वाद सुरू होता.
संजीतनं अविनाशची डीएनए चाचणी करण्याची मागणी त्यानं केली. यामुळे पुष्पा संतापली. तिनं रात्री ११ च्या सुमारास अविनाशची गळा दाबून हत्या केली. मुलगा बेशुद्धावस्थेत असल्याचं पाहून संजीतनं त्याला रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. रुग्णालयातून घटनेची माहिती मिळताच त्यांनी शवविच्छेदन करण्याच्या सूचना दिल्या. मुलाचा मृत्यू गळा आवळल्यानं झाल्याचं त्यातून समोर आलं. पोलिसांनी संजीत आणि पुष्पाची चौकशी सुरू केली. त्यानंतर पुष्पानं गुन्हा कबूल केला.