नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कौशांबीमध्ये (Kaushambi News) नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सासरच्यांकडून बुलेट (Bullet Bike) न मिळाल्याने नाराज झालेल्या पतीने आपल्या पत्नीला तब्बल 6 दिवस डांबून ठेऊन तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला कशीबशी पतीच्या तावडीतून आपली सुटका केली आणि पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांना आपल्यासोबत घडलेला भयंकर प्रकार सांगितला आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या पतीने माहेरच्यांकडून बुलेट आणण्यास सांगितलं होतं. मात्र त्याला बुलेट न मिळाल्याने पती नाराज झाल्याची माहिती महिलेने दिली आहे.
संतापलेल्या पतीने मला आठवड्याभर बांधून ठेवलं होतं. त्यानंतर त्याने बेल्टने मला बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कौशांबी येथील सराय अकिल पोलीस स्टेशन परिसरातील डहिया गावात ही महिला आपल्या पतीसोबत राहते. राज कुमार असं आरोपी पतीचं नाव आहे. राज कुमार याची पत्नी रिनानं त्यांच्यावर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप लावले आहेत. चार वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं होतं. त्यांना दोन वर्षांचा मुलगा देखील आहे.
रिनाने दिलेल्या माहितीनुसार, राज कुमार मुंबईमध्ये प्रायव्हेट नोकरी करत होता. लॉकडाऊनमुळे त्याची नोकरी गेली. त्यामुळे तो घरी परतला. गेल्या काही महिन्यांपासून तो मला माहेरच्यांकडून बुलेट देण्याची मागणी करू लागला आहे. रिनाच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांनी जावयाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही राज कुमारने रिनाची छळवणूक केली. बुलेट न मिळाल्यानं राजकुमार खूप नाराज होता. 6 जुलैच्या रात्री रिना भांडी घासत असताना राज कुमारने बुलेटवरुन वाद घालण्यास सुरुवात केली.
बुलेटसाठी पत्नीचा केला छळ, बेल्टने केली बेदम मारहाण
राज कुमारने रिनाला ओलीस ठेवलं आणि बेल्टने बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे आरोपी पतीने रिनाला तब्बल 6 दिवस डांबून ठेवलं आणि तिला रोज खूप मारहाण करत केली. रविवारी रिना त्याच्या तावडीतून सुटली आणि पोलिसांना जाऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. पीडित महिलेच्या शरीरावर मारहाणीच्या खूना असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच जखमांच्या आधारावर महिलेची मेडिकल चाचणी केली जाणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.