नवरदेवांनो! खबरदार पत्नीची तुलना दुसऱ्या महिलेशी कराल तर...; उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 02:06 PM2022-08-17T14:06:41+5:302022-08-17T14:08:20+5:30
केरळ न्यायालयात घटस्फोटाचे एक प्रकरण आले होते. पतीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने आधी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि नंतर चांगलेच सुनावले आहे.
केरळच्या उच्च न्यायालयाने पत्नीवरील होणाऱ्या अत्याचारांवर महत्वाची टिप्पणी केली आहे. यामुळे नवरदेवांना आता पत्नीशी बोलताना सावध रहावे लागणार आहे. पत्नीची इतर महिलांशी तुलना करणे हे मानसिक क्रूरतेच्या श्रेणीत येते, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्याच्या अपेक्षेप्रमाणे ती वागत, राहत नाही, असा त्याचा अर्थ होतो, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
केरळ न्यायालयात घटस्फोटाचे एक प्रकरण आले होते. पतीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने आधी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि नंतर चांगलेच सुनावले आहे. त्याचे २०१९ मध्ये लग्न झाले होते. दोघांमधील वाद मिटविण्याचे प्रयत्न विफल ठरल्यानंतर पती उच्च न्यायालयात गेला होता.
यावर महिलेकडून पती छळ करत असल्याचे आरोप करण्यात आले होते. न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन आणि सीएस सुधा यांच्या खंडपीठाने या प्रकरणी पतीकडून पत्नीची दुसऱ्या महिलेसोबत तुलना करणे ही क्रूरता आहे, पत्नीकडून हे सहन केले जाईल, अशी अपेक्षा करता येणार नाही असे म्हटले आहे.
केरळच्या हायकोर्टात पत्नीने पतीवर छळाचे आरोप केले. पती तिला क्यूट दिसत नाही, त्याला हवी तशी ती नाहीय, यामुळे त्याला निराश वाटते, असे म्हणायचा. न्यायालयाने या प्रकरणी मध्यस्थी देखील करण्याचा प्रयत्न केला. परंतू तो सफल झाला नाही. कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले की, पती-पत्नी एकदा का वेगळे झाले तर त्यांच्यातील अबोला खूप जास्त काळ असतो. यानंतर दोघांपैकी एक कोणीतरी घटस्फोटासाठी याचिका दाखल करतो तेव्हा असे मानले जाते की लग्न आता जवळपास तुटल्यात जमा आहे.