राजकुमार जाेंधळे, औसा (जि. लातूर): लातूर-औसा महामार्गावरील खडी केंद्र परिसरात हरंगुळ (बु.) येथील ऑटोचालक इस्माईल मुबारक मणियार (वय ४२) यांचा खून झाल्याची घटना ८ ऑक्टाेबर राेजी घडली. दरम्यान, या खुनाचा उलगडा पाेलिसांनी अवघ्या ३६ तासात केला. पत्नी व इतरांनी संगनमत करुन अडसर ठरणाऱ्या पतीचा सुपारी देत काटा काढल्याची कबुली दिली. यातील दोघांना अटक केली असून, त्यांना बुधवारी औसा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर पत्नीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु.) येथील इस्माईल मणियार हा ऑटो चालवून उदरनिर्वाह करत होता. मयत हा ऑटोची सर्व्हिसिंग आरोपी आशपाक युसूफ शेख यांच्या ऑटो गॅरेजमध्ये करत होता. वारंवार सर्व्हिसिंग करत असल्याने दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. यातूनच मयताने आपल्या मुलाला ऑटो गॅरेजचे काम शिकण्यासाठी आशपाक शेख याच्या गॅरेजमध्ये कामाला ठेवले. मुलाला बोलावण्यासाठी आशपाक हा मयत ऑटाेचालक इस्माईल मणियार यांच्या घरी फोन करत होता. सततच्या फाेनमुळे आलेल्या संपर्कातून गत वर्षांपासून मयताची पत्नी आणि आशपाक याच्यात जवळीकता वाढली हाेती.
पत्नी हरवल्याचा बनाव; ऑटो घेतली भाड्याने...
फरार आरोपी कामगिरीवर निघाला हाेता. त्यांने ऑटाेचालक इस्माईलवर दोन दिवस नजर ठेवत त्याचा बारकाईने अभ्यास केला. ७ ऑक्टोबर रोजी माझी पत्नी कुठेतरी गेली आहे. तिला शोधण्यासाठी तुमचा ऑटो भाड्याने पाहिजे, असे सांगून ताे ऑटाेचालकाला औशाच्या दिशेने घेऊन गेला. औसा टी-पाईंटवरही ते आले हाेते. दरम्यान, तेथून विचारपूस करत ते औसा-लातूर महामार्गावरील खडी केंद्र परिसरात आले. पत्नी येथेच कुठेतरी असेल, चला बघुया... म्हणून महामार्गालगत नेत लोखंडी रॉड, इतर साहित्याने जबर मारहाण केली. यामध्ये ऑटोचालक इस्माईल याचा मृत्यू झाला.
अन् जवळीकता वाढल्याने घरात पडली वादाची ठिणगी...
दरम्यान, या संबंधाची कुणकुण पतीलाही लागली हाेती. तो पत्नीला वारंवार रागवत होता. शिवाय, घरात यातूनच वादाची ठिणगी पडली. सतत वाद-भांडण होत हाेते. मग, पत्नी आणि आशपाकमध्ये संपर्क कमी झाला. संपर्कात अडथळे येत हाेते. दोघांनी विचार केला. अडसर ठरणाऱ्या पतीचे पाय तोडण्याचा कट रचला. यासाठी लातुरातील जाकीर अब्दुल गफार शेख (वय ३०) याने आरोपीची भेट घडवून दिली. त्याला २० हजारात पाय तोडण्याची सुपारी देण्यात आली. मात्र, ऑटाेचालकाचा काटा काढण्यात आल्याचे पाेलिस तपासात समाेर आले. - सुनील रेजितवाड, पाेलिस निरीक्षक, औसा