बरेली - उत्तर प्रदेशात सातत्याने हुंड्यामुळे महिलांच्या हत्या होत असल्याचं समोर येत आहे. आता बरेली येथील चैनपूरमध्ये हुंड्यात बुलेट न दिल्यानं सासरच्या मंडळींना राग आला. त्यांनी सूनेला जाळून टाकलं. आगीत भाजल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. आता महिलेच्या मृत्यूनंतर माहेरच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंद करत सासरच्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवला आहे.
पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मृत महिलेच्या आईनं सांगितले की, हाफिज गंज येथे राहणारी आमची मुलगी राजवीचं लग्न बिथरीच्या तालिबसोबत ३ वर्षापूर्वी झालं होते. मुलीने दीड महिन्यापूर्वी मुलीला जन्म दिला होता. मुलीच्या जन्मानंतर सासरची मंडळी आणि पती सूनेचा छळ करू लागले. इतकेच नाही तर हुंड्यात बुलेटची मागणी केली आणि बुलेट दिल्यास घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली. मुलीने आम्हाला फोन केला तेव्हा आम्ही सासरी पोहचलो. पतीने आतून दरवाजा बंद केला त्यामुळे मुलीशी बोलणंही झाले नाही.
पती आणि सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी मुलीला पेटवून दिले असा आरोप मृत महिलेच्या आईने केला आहे. आई म्हणाली की, माझी मुलगी राजवीला सासरकडून बुलेटची मागणी केली जात होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने हुंड्यासाठी त्यांनी मुलीला जाळलं. जेव्हा जखमी अवस्थेत मुलीला हॉस्पिटलला नेण्यात आले तेव्हा तिचं शरीर ८० टक्के भाजले होते असं डॉक्टरांनी सांगितले. उपचारावेळी ६ तासानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आले.
या प्रकरणी बिथरी चैनपूरचे पोलीस निरीक्षक हिंताशु शर्मा म्हणाले की, हाफीज गंजला राहणाऱ्या एका महिलेचे लग्न ३ वर्षापूर्वी झाले होते. महिलेच्या आईने सासरच्या मंडळींवर हुंड्याचा आरोप लावला आहे. हुंड्यासाठी हत्या करण्याचा आरोप केला आहे. महिलेच्या आईनं दिलेल्या तक्रारीनंतर या चौकशीला सुरूवात झाली आहे.