गाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये एका महिलेने इंजिनिअर पतीविरोधात पोलिसांकडे अजब तक्रार केली आहे. पतीचे दुसऱ्या कोणत्यातरी महिलेसोबत लफडे असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. यामुळे या दांम्पत्यामध्ये काऊन्सिलिंग करण्याची वेळ इंदिरापुरमच्या पोलिसांवर आली आहे.
महिलेने केलेल्या तक्रारीनुसार पती तिला बहिणीसारखे ठेवतो, वागवतो. विरोध केल्यास गप्प बसण्यासाठी दटावतो. त्यांचे लग्न १४ वर्षांपूर्वी झालेले आहे. पती एक एमएनसीमध्ये इंजिनिअर आहे. पती या महिलेला घरात यापुढे बहीणीसारखी रहा, असे सांगत असल्याची तक्रार केली आहे.
महिलेने विरोध केला तेव्हा तिला गप्प बसण्यास सांगितले. या प्रकाराची माहिती माहेरच्यांना देते असे सांगितले तेव्हा तिला घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली. मुलांनीही वडिलांना समजाविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो समजून घेण्यास तयार नाही, असे सांगण्यात आले.
आता महिलेचे म्हणणे आहे की, यानंतर संशय आल्याने जेव्हा माहिती काढली तेव्हा समजले की पतीचे दुसऱ्या महिलेसोबत लफडे सुरु आहे. यामुळे त्रस्त झालेल्या महिलेने पोलीस ठाणे गाठले. पोलीस अधिकारी मनीष बिष्ट यांच्या म्हणण्यानुसार पती आणि पत्नीमधील वाद सोडविण्यासाठी त्यांना काऊंसिलिंगची गरज आहे. यामुळे हे प्रकरण महिला पोलीस ठाण्याला वर्ग करण्यात आले आहे.