नवी दिल्ली – दारुच्या नशेत पतीने पत्नी आणि तीन मुलांवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यावेळी हा प्रकार घडला तेव्हा पत्नी आणि मुलांच्या ओरडण्याने आजूबाजूचे लोक त्यांच्या मदतीसाठी धावले. या चौघांना जगप्रवेश चंद रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं मात्र तेथून त्यांना एम्समध्ये पाठवण्यात आलं आहे.
पोलिसांचा दावा आहे की, शाहिद दररोज आपल्या पत्नीबरोबर भांडत असे. शाहिद (३२) याला अॅसिडच्या बाटलीसह पकडण्यात आलं. त्यानंतर शास्त्री पार्क पोलिस स्टेशनने आरोपीला न्यायालयात हजर केले असता तिथून त्याला तुरुंगात पाठविले. शाहिद कुटुंबासह शास्त्री पार्कच्या सी-ब्लॉकमध्ये गल्ली नंबर ९ येथे भाड्याच्या घरात राहतो. पत्नी मुमताज(२८)सह त्याला आठ, सहा आणि ४ वर्षाची तीन मुले आहेत.
शाहिद फळांचा व्यवसाय करतो, छोट्या छोट्या गोष्टींवरून पती-पत्नीमध्ये दररोज भांडण होत असे. शाहिदला दारूचे व्यसन आहे. शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास तो बाहेरून मद्यधुंद अवस्थेत घरी आला होता. त्याच्या हातात अॅसिडची बाटली होती. तो पत्नीशी भांडण करू लागला. तिन्ही निर्दोष मुलंही तिथे उभी होती. दारुच्या नशेत शाहिदचा राग अनावर झाला आणि त्याने पत्नी आणि मुलांवर अॅसिड फेकले.
या घटनेने पत्ती आणि मुले जोरजोरात ओरडू लागली तेव्हा घरमालक तातडीने त्याठिकाणी पोहचले. रुममधील ते दृश्य पाहून त्यांना धक्का बसला, बाकी लोकांच्या मदतीने शाहिदला पकडण्यात आलं. त्यानंतर पत्नी आणि मुलांना जवळच्या जगप्रवेश चंद रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवलं. सध्या पत्नी मुमताज आणि ४ वर्षाच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे तर इतर दोघांना रुग्णालयातून उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.