Crime News : लग्नानंतर लोक आपल्या पार्टनरसोबत सुखी संसार सुरू करतात. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि एकमेकांच्या ईच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन देतात. हाशिम नावाच्या व्यक्तीचं लग्न झालं आणि त्याने पत्नीला हनीमूनला नेणार असं आश्वासन दिलं होतं. पण मुरादाबादच्या हाशिमकडे पत्नीला मनालीला हनीमूनला नेण्यासाठी पैसे नव्हते. अशात त्यानंतर त्याने जे केलं ते वाचून तुम्हाला धक्का बसेल.
पत्नीला दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी हाशिमने 3 जून रोजी शहरातील एका भागातून एक नवीन बुलेट बाईक चोरी केली. त्यानंतर 4 जूनला तो सागर सरायमध्ये गेला. या भागात औधध विक्रेत्यांची होलसेल दुकाने आहेत. हाशिमने एका मेडिकल एजन्सीवर नजर ठेवली. तिथे येणाऱ्या एका एमआरवरही त्याने नजर ठेवली. अमरोहाहून आलेल्या नासीर नावाच्या एमआरची 1 लाख 90 हजार रोख रक्कम असलेली बॅग हाशिमने पळवली. त्यानंतर बाईक आणि पत्नीला घेऊन हाशिम कुल्लू मनाली निघाला.
पोलिसांना जेव्हा चोरीची सूचना मिळाली तेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर चोराने मास्क लावला होता. त्यामुळे तरूणाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी घटनेच्या आधीचे आणि नंतरचे 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात त्यांना तरूणाचा चेहरा दिसला. आरोपी हाशिमची ओळख पटवत पोलिसांनी त्याचा नंबर सर्विलांसवर टाकला. पोलिसांना त्याचं लोकेशन हिमाचल प्रदेश दिसलं. पण नंतर फोन स्विच ऑफ झाला.
त्याचा फोन काही दिवसांनी पुन्हा ऑन झाला तेव्हा मुरादाबाद पोलीस त्याची वाट बघू लागले होते. जसा हाशिम शहरात पोहोचला तेव्हा त्याला अटक करण्यात आली. चौकशी केल्यावर त्याने चोरी केल्याचं कबूल केलं.
हाशिमने पोलिसांना सांगितलं की, त्याने त्याच्या पत्नीला हनीमूनला चांगल्या हिल स्टेशनवर नेणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. लग्न जानेवारीमध्ये झालं होतं. पण पैसे नसल्याने ते कुठे जाऊ शकले नाही. तेव्हा त्याने ही चोरी केली. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.