पुणे : पत्नी आणि तिच्या प्रियकराने केलेल्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची तक्रार पुण्यातील समर्थनगर पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील कोंढवा भागात राहणाऱ्या मोहम्मद असगर या व्यक्तीने ट्रेन खाली उडी मारुन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी असगरची पत्नी अश्मा शेख, तिची आई राजिया अन्सारी, भाऊ परवेझ अन्सारी आणि अश्माच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मोहम्मद असगरला आत्महत्येचा प्रवृत्त केल्या प्रकरणी चौघांविरोधात कलम ३०६,३२३, ५०४ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत असे म्हटले आहे की, पत्नी अश्माने आईवडिलांबरोबर भांडण केले व स्वतंत्र रहायचे असा नवऱ्याकडे हट्ट धरला. त्यामुळे मोहम्मद असगर यांनी कोंढवा येथे फ्लॅट विकत घेतला. तिथे ते दोघे रहायचे. मात्र तिथे त्यांच्यात होणाऱ्या भांडणांना आणि तिच्या छळाला कंटाळून त्याने घर सोडले व गेल्या १० महिन्यांपासून तो आईवडिलांसोबत राहत होता असे मोहम्मद असगरचे वडिल मोहम्मद शरीफ इस्माइल शेख यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.
अश्माने आपल्या पत्नीला मारहाण केली व तिच्या प्रियकराने माझ्या मुलाला असगरला मारहाण केली असा आरोप इस्माइल शेख यांनी केला. अश्मा आपल्या मुलाचा छळ करत होती. फ्लॅट तिच्या नावावर करण्यासाठी दबाव आणत होती असे इस्लाइल शेख यांचा आरोप आहे. पोलिसांना असगरकडे एक सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये त्याने आत्महत्येसाठी पत्नी, तिच्या प्रियकराला आणि तिच्या आईला जबाबदार धरले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.