उत्तर प्रदेशातील झाशी येथील एका तरुणाला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याबाबत तक्रार करण्यासाठी तो त्याच्या सासरी गेला. पण हे काम करणं त्याला चांगलंच महागात पडलं आहे. पालकांनी महिलेची बाजू घेत तरुणाला बेदम मारहाण केली. लाथा-बुक्क्यांनी मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आता या तरुणाने एसपी कार्यालय गाठून न्यायाची मागणी केली आहे.
झाशी जिल्ह्यातील कोतवाली भागातील लक्ष्मी गेट येथे ही घटना घडली आहे. येथील रहिवासी महेंद्र कुशवाह याने आपल्या कुटुंबासह जखमी अवस्थेत पोलिसात धाव घेतली. महेंद्रने सांगितलं की, तो महापालिकेत माळी म्हणून काम करतो. त्याला दोन मुलं आहेत. तो सकाळी 9 वाजता ऑफिसला जातो आणि 5 वाजता घरी परततो. 1 फेब्रुवारी 2016 रोजी काजल नावाच्या महिलेशी त्याचा विवाह झाला होता.
25 सप्टेंबर रोजी सायंकाळी तो ड्युटीवरून घरी आला असता पत्नी काजल फोनवर बोलत असल्याचे दिसलं. त्याने पत्नीला विचारलं असता ती काहीच बोलली नाही. उलट तिने गोंधळ घालायला सुरुवात केली. काजलने तिच्या कुटुंबाला बोलावलं. महेंद्रने याबाबत पालकांकडे तक्रार केली असता ते संतापले. तुम्ही मुलीचा छळ करत आहात, खोटे आरोप करत आहात, असं म्हटलं.
महेंद्रला यानंतर काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यात महेंद्रच्या डोक्याला दुखापत झाली. तो जखमी झाला. बहीण त्याला वाचवण्यासाठी आली असता तिलाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. मारहाणीची ही घटना तिथे उपस्थित असलेल्या कोणीतरी त्याच्या मोबाईलमध्ये कैद केली, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महेंद्रने आपल्यासोबत घडलेल्या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात केली, मात्र मदत न मिळाल्याने त्यांनी एसपी कार्यालय गाठून न्यायाची मागणी केली.
याप्रकरणी नगरचे पोलीस अधीक्षक म्हणाले की, कोतवाली परिसरात झालेल्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत माहिती घेतली असता पती-पत्नीमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. पत्नीच्या कुटुंबीयांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली होती. तक्रार दाखल केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.