पत्नीच्या सौंदर्यामुळे चिंतीत पतीने विद्रुप केला तिचा चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 09:21 AM2018-08-29T09:21:06+5:302018-08-29T09:22:22+5:30
रुपवान पत्नीवर कुणाची तरी वाईट नजर पडेल म्हणून चिंतीत असलेल्या पतीने तिचा चेहरा विद्रुप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबई - रुपवान पत्नीवर कुणाची तरी वाईट नजर पडेल म्हणून चिंतीत असलेल्या पतीने तिचा चेहरा विद्रुप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे हाच माणूस दुसऱ्या महिलांकडे मात्र वाईट नजर ठेवायचा. या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्यावर बलात्कार आणि शोषणाचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
राज रायकवार असे या विकृत इसमाचे नाव असून, तो मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी आहे. बॉलिवूडमध्ये काम करत असल्याने तो मुंबईत वास्तव्यास असतो. तर त्याचे कुटुंबीय जबलपूर येथे राहते. 12 वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला असून, त्याला दोन मुले आहेत. मात्र पत्नी फार सुंदर असल्याने तो चिंतेत होता. आपण मुंबईत राहत असल्याने जबलपूर येथे राहणाऱ्या पत्नीवर कुणी वाईट नजर तर ठेवणार नाही ना, असे त्याला नेहमी वाटे. त्यामुळे एके दिवशी त्याने मच्छर मारण्याच्या कॉईल लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पत्र्याच्या स्टँडच्या पत्र्याने पत्नीच्या चेहऱ्यावर वार करून तिला जखमी केले.
दरम्यान, या विकृताच्या पत्नीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील सहार परिसरातील एका अल्पवयीन मुलीला रायकवार याने खाऊ देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले होते. तेथे त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला अटक केल्यानंतर जबलपूर येथे त्याने आपल्या पत्नीसोबत केलेल्या घृणास्पद कृत्याचा उलगडा झाला होता. तसेच त्याच्याविरोधात शोषणाचा अजून एक गुन्हा दाखल असल्याचेही समोर आले होते.