शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, घारगाव: पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर सातच दिवसात पतीनेही गळफास घेऊन जीवन संपविले. “पत्नीवर खूप जीव होता, तिची आठवण येत आहे” अशी चिठ्ठी पतीकडे सापडली. ही घटना संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी येथे बुधवारी (दि.१९) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. तान्हाजी ज्ञानदेव बोडके (वय-३२) व त्यांची पत्नी सारिका तान्हाजी बोडके (वय-२६) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
सारिका व तान्हाजी बोडके हे दाम्पत्य म्हसवंडी येथे राहत होते. त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. १३ जुलै रोजी सारिका हिने राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सात दिवसानंतर बुधवारी तान्हाजी बोडके यांनी परिसरातील गवळी बाबाचे दांड येथील वनविभागाचे क्षेत्रात एका झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविला. आत्महत्येपूर्वी तान्हाजी यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये “पत्नीवर खूप जीव होता, तिची आठवण येत आहे. मी आत्महत्या करत आहे. माझी जमीन मुलीला देण्यात यावी. कोणालाही दोष देऊ नये” असा मजकूर लिहिला आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत वैभव विठ्ठल बोडके यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घारगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.