उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. फ्लाइट लेफ्टनंट पतीने आग्रा येथे आत्महत्या केली आणि त्यानंतर दिल्लीत राहणाऱ्या त्याच्या पत्नीनेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे फ्लाइट लेफ्टनंटचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दीनदयाळ असं फ्लाइट लेफ्टनंटचं नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. दीनदयाळच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याची दिल्लीत राहणारी पत्नी रेणूला मोठा धक्का बसला. त्यानंतर तिनेही आत्महत्याही केली. दिल्ली कँटमधील ऑफिसर्स गेस्ट हाऊसमध्ये रेणूचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दिल्ली पोलिसांना बुधवारी याबाबत माहिती मिळाली.
पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे, ज्यामध्ये लिहिलं होतं की, "पतीसोबतच अंत्ययात्रा काढा. आमच्यावर एकत्र अंत्यसंस्कार करा आणि माझा हात माझ्या पतीच्या हातात ठेवा." मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइट लेफ्टनंट पतीने आग्रा येथे आत्महत्या केली होती. यानंतर रेणूने दिल्लीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या खोलीत सुसाईड नोट सापडली.
या कपलने २०२२ मध्ये म्हणजे दोन वर्षांपूर्वीच लव्ह मॅरेज केलं होतं. दोघांच्या मृत्यूने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नीनेही आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. रेणू दिल्लीतील गरौता ऑफिसर्स गेस्ट हाऊसमध्ये थांबल्या होत्या. त्याच वेळी पती आग्रा येथील एअर फोर्स स्टेशनवर फ्लाइट लेफ्टनंट म्हणून तैनात होते. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.