पणजी - मारेकऱ्याच्या आजूबाजूला कुणी नव्हते. हल्लेखोराला आपल्याला कुणी पाहतंय हेदेखील कळाले नाही. परंतु ज्यावेळी ही हत्या झाली तेव्हा तिथेच काही दूर अंतरावर बसलेली एक महिला समुद्राच्या लाटांचे दृश्य कॅमेऱ्यात कैद करत होती. यावेळी ही हत्यादेखील कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली. त्यानंतर पुढे जे काही घडले ते हैराण करणारे होते. गोव्याच्या सुंदर समुद्रकिनारी एक पती त्याच्या पत्नीचा खून करत होता. त्यावेळी बीचपासून दूर एका घरात काही लोक बसले होते. ते समुद्राच्या लाटा त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करत होते. मात्र याचवेळी त्यांच्या कॅमेऱ्यात एक लाईव्ह मर्डरही कैद झाला.
१९ जानेवारी, शुक्रवारी दुपारची ३.४५ ची वेळ. दक्षिण गोव्याच्या काबो डी रामाच्या प्रसिद्ध राजबाग बीचवर पर्यटकांची गर्दी होती. परंतु याच बीचवर एक कोपरा असा होता की ज्याठिकाणी मोठमोठी दगडे होते. समुद्राच्या लाटा या दगडांपर्यंत पोहचत नाहीत. याठिकाणी पाणी कमी असल्याने पर्यटकही कमीच असतात. परंतु त्यादिवशी २ लोक त्या बीचवर पोहचतात. एक महिला आणि एक पुरुष. काही वेळानंतर महिलेसोबत आलेला पुरुष परत जातो. परंतु ती महिला त्याच्यासोबत नसते. काबो डी रामा या परिसरात राजबाग इथं समुद्रकिनारी अनेक घरे आहेत. ज्याठिकाणी पर्यटक राहतात. अशाच एका अपार्टमेंटमध्ये बसलेली महिला पर्यटक तिच्या मोबाईलमध्ये समुद्राचे दृश्य कैद करत होती. परंतु या कॅमेऱ्यात ते कपल दिसते. ज्यातून पुरुष परत जातो पण महिला नाही.
ती कॅमेरा फोकस करून पाहते तेव्हा तिथे काही संशयास्पद होत असते. तो पुरुष पुन्हा परत जात असतो. तो एकदा दोनदा तिथे माघारी परततो, परंतु त्यानंतर तिसऱ्यांदा तो पुरुष घाबरलेल्या अवस्थेत धावतो. तेव्हा त्याला पाहून बीचवरील महिला पर्यटकही त्याच्यामागे धावते. पुढे धावणारा व्यक्ती अचानक समुद्र किनारी असलेल्या दगडाजवळ थांबतो. तिथे वाकून पाहताना त्याला महिलेचा मृतदेह दिसतो. ही महिला त्याचीच पत्नी असते. बीचवर फिरायला आलेली पत्नी समुद्राच्या लाटेचा शिकार बनते आणि बुडून तिचा मृत्यू होतो असं त्याला भासवायचे होते. परंतु महिलेच्या कॅमेऱ्यात सगळं कैद झालेले असते ज्यातून हा खून झाल्याचे उघड होतो.
लखनऊचा गौरव कटियार मागील ७ वर्षापासून गोव्याच्या समुद्रकिनारी राहतो. त्याचे लग्न दीक्षा गंगवारसोबत २०२२ मध्ये झालेले असते. लग्नानंतर गौरव पत्नीसह गोव्यात राहतो. परंतु मागील काही काळापासून दोघांमध्ये वाद सुरू होता. १९ जानेवारीला पूर्ण प्लॅनिंगनुसार गौरव दीक्षाला घेऊन राजबाग बीचवर गेला. त्याला हा बीच माहिती होता. समुद्राच्या एका कोपऱ्यात जिथे कुणीच नसते याठिकाणी गौरवनं समुद्राच्या पाण्यात दीक्षाचे तोंड दाबून धरले. जोवर तिचा मृत्यू होत नाही तोवर तिचे तोंड पाण्याच्या बाहेर काढले नाही. त्यानंतर तिची हालचाल बंद झाल्यावर तो तिथून निघून जिथे पर्यटक आहेत तिथे येतो. थोड्यावेळाने तो पुन्हा त्याच जागी जाऊन दीक्षाचा मृत्यू झालाय का हे पाहतो. दीक्षाचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे गौरवला दाखवायचे होते. परंतु ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यामुळे गौरवचा खेळ उघड झाला. त्यानंतर गोवा पोलिसांनी गौरवला अटक केली.