गाजियाबाद – मोदीनगरच्या उमेश पार्क कॉलनीत मंगळवारी एका आरोपीनं गळा कापून दुसऱ्या पत्नीची हत्या केली. या घटनेनंतर खोलीला टाळा लावून आरोपीने पळ काढला. रात्री उशिरापर्यंत त्याच्या घराला लागलेलं कुलुप पाहून शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस पोहचले तेव्हा त्यांनी दरवाजा उघडताच धक्कादायक दृश्य समोर पाहायला मिळालं.
पोलिसांनी आतमध्ये एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहिलं. या मृत महिलेच्या भावाचा आरोप आहे की, माझी बहीण संपत्तीमधील काही भाग मुलांच्या नावानं करण्यासाठी तिच्या पतीकडे मागणी करत होती. परंतु पती काही ऐकण्यास तयार नव्हता. बहिणीकडून दबाव येत असल्याने त्यानेच माझ्या बहिणीची हत्या केली असावी असा संशय त्याने व्यक्त केला. मृत महिलेच्या वडिलांनी याबाबत पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे.
हापूड गावातील रहिवासी पप्पूने मुलगी पूजा हिचं लग्न १८ वर्षापूर्वी अबूपुर गावातील हरेंद्रसोबत केले होते. काही वर्षांनी हरेंद्रचा मृत्यू झाला. पूजा तिची दोन मुलं मनिष आणि प्रियंकासह वेगळी राहायला लागली. त्यावेळी तिचे संबंध गावातील सुभाष नावाच्या व्यक्तीशी जुळले. पूजाचा भाऊ सोनू म्हणाला की, २०१५ मध्ये सुभाषने पूजासोबत कोर्ट मॅरेज केले. सुभाष ८ महिने पूजा आणि दोन मुलांसह मोदीनगर भागात भाड्याने रुम घेऊन राहत होता. अलीकडेच ते उमेश पार्क कॉलनीत शिफ्ट झाले.
सुभाषचं आधीच एक लग्न झाल्याचं कळालं तेव्हापासून पुजानं सुभाषला संपत्तीचा काही भाग मुलांच्या नावानं करण्यास सांगितले. पुजा त्यासाठी सुभाषवर दबाव टाकत होती. तेव्हा संधी मिळताच सुभाषनं पुजाचा काटा काढण्याचं ठरवलं. मंगळवारी घरी कुणी नसताना सुभाषनं पुजाची हत्या केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सकाळी पूजाची दोन्ही मुलं शाळेत गेली होती. त्यावेळी सुभाषने पुजाची हत्या करुन घराला टाळा लावून पसार झाला. दिवसभर खोलीत काहीच हालचाल न झाल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी दरवाजा उघडताच पूजाचा मृतदेह जमिनीवर पडल्याचं पाहिलं.
मुलांनाही मारण्याचा डाव
सोनूने आरोप केलाय की, सुभाष पूजाची हत्या करुन मनिष आणि प्रियंका यांना शाळेतून थेट अबूपुरला गावाला नेले. आईबाबत मुलांनी विचारणा केली असता आई शिमला येथे पिकनिकला गेल्याचं सांगितले ती काही वर्षांनी येईल असं म्हटलं. काही वेळाने अबूपुरहून मुलांना घेऊन तो जंगलातील एका घरात गेला. त्याचवेळी सुभाषला शोधत असणारी पोलीस तिथे पोहचली असता सुभाष मुलांना तिथेच सोडून पळून गेला. सुभाषने मुलांनाही संपवण्याचा डाव रचल्याचा आरोप पूजाच्या नातेवाईकांनी केला. सध्या सुभाष फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.