बापू सोळुंके, छत्रपती संभाजीनगर: 'तू आम्हाला आवडत नाही, तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही. कपडे घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेवून ये' म्हणत विवाहितेला मारहाण करून तिच्या गर्भपातास कारणीभूत ठरलेल्या पतीसह सासू-सासरे व दिराला पाच वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली प्रत्येकी २६ हजार रुपयांची दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. एम. जमादार यांनी ठोठावली. दंडाची रक्कम ही पीडितेला देण्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.
पती विक्रम भानुदास पोटफाडे (२६), सासरा भानुदास तोलीराम पोटफाडे (४९), सासु तारामती भानुदास पोटफाडे (४६) आणि दीर सागर भानुदास पोटफाडे (२१, सर्व रा. इंदरानगर ता.पैठण) अशी आरोपींची नावे आहेत.
प्रकरणात जयश्री विक्रम पोटफाडे (२४) यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली होती. या तक्रारीनुसार २ फेब्रुवारी २००६ रोजी पीडितेचे लग्नआरोपी विक्रम याच्याशी झाले होते. विक्रमचे पैठण येथे पैठणी साडीचे दुकान आहे. लग्नाचे १०-१५ दिवस पीडितेला चांगले वागवल्यानंतर विक्रम हा दारु पिवून पीडितेला, तु मला आवडत नाही, तुझ्या वडीलांनी लग्नात हुंडा दिला नाही. त्यामुळे मी तुला पत्नीचा दर्जा देत नाही असे म्हणून शिवीगाळ, मारहाण करीत होता. पीडितेच्या वडीलांची आर्थिक परिस्थिती हुंडा देण्याची नसल्याने पीडिता ञास सहन करीत होती. दरम्यानच्या काळात पीडितेला एक मुलगी झाली. दरम्यान पीडिता पुन्हा गर्भवती राहिली. ही बाब माहिती असूनही माहेरहून एक लाख रुपये आणण्यासाठी तिचा छळ केला, तिला शिवीगाळ, मारहाण करुन उपाशी ठेवून घराबाहेर काढले. विवाहितेने हा प्रकार आई-वडीलांना सांगितला. त्यांनी आरोपींची समजूत काढली.
यानंतरही माहेरहून एक लाख रुपये आणले नाहीस तर तुला घटस्फोट देईल, असे म्हणून पीडितेच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, गर्भ काढला नाही तर बाळ आणि तिच्या जीवाला धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.एस. देशमुख यांनी तपास करुन दोषारोपपञ दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणी वेळी सहाय्यक सरकारी अभियोक्ता एम.एम. अदवंत आणि एन.बी. धोंगडे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने वरील आरोपींना भादंवी कलम ३१३ अन्वये पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी २५ हजारांचा दंड आणि भादंवी कलम ३२३ अन्वये एक वर्षाचा कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.