लातूर : तालुक्यातील भातांगळी येथे सासरवाडीत आलेल्या नवऱ्यानेच झोपेत असलेल्या पत्नीचा आणि मेहुण्याचा धारधार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
ऐन वटपौर्णिमेदिवशीच पत्नीसह मेहुण्याचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. सूवर्णा विकास भोपळे या विवाहितेचे भातांगळी हे माहेर आहे. त्यांचा थेरगाव (ता. शिरुर अनंतपाळ) येथील विकास भोपळे (40) याच्याशी रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवस त्यांचा संसार सुरळीत सुरु होता. दरम्यान, त्यांना एक मुलगा, एक मुलगी झाली. दोघा पतीपत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन सातत्याने भांडण होत होते. सतत बहिणीला मारहाण होत असल्याने युवराज निरुडे याने बहिणीला माहेरी आणले होते.गेल्या चार दिवसांपासून सुवर्णा ही माहेरी असताना शनिवारी मध्यरात्री विकास भोपळे हा दुचाकीवरून आला व घराबाहेर झोपलेल्या पत्नीच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले. तर मेहुणा मारेल या भीतीने त्याच्यावरही शस्त्राने सपासप वार करुन ठार केले. यामध्ये पत्नी सुवर्णा भोपळे व मेहुणा युवराज निरुडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सासू भागिरथीबाई या भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडल्या असता, त्यांच्या हातावरही वार करण्यात आला. यामध्ये त्याही जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर विकास हा स्वतःहून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला.
याबाबत लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादी भागीरथीबाई तानाजी निरुडे (45) गुरनं. 94 / 2019 कलम 307, 302 भादंविप्रमाणे गुन्हादाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लातूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील हे करीत आहेत.
संशयाने केला घात...आरोपी विकास आणि सूवर्णा यांच्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरुन सतत वाद होत होते. दरम्यान, नातेवाईकांनी समजूत घालण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्यातील वाद काही थांबला नाही. यातूनच सासरवाडीकडील मंडळीसमवेत त्यांचे भांडण होत असत. अखेर याला कंटाळून सुवर्णाला मयत भाऊ युवराज याने माहेरी भातांगळी येथे आणले होते. मात्र विकासच्या डोक्यात असलेल्या संशयाने पत्नी आणि मेहुण्याचा शनिवारी झोपेतच घात केला. खून करण्याच्या इराद्याने तो सासरवाडीत आला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.