नालासोपारा - रविवारी नातेवाईकांच्या लग्नात गेलेल्या पती- पत्नीचा कोणत्या तरी कारणावरून वाद झाल्याने रात्री घरी आल्यानंतर किरकोळ भांडण झाल्यावर रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे. पतीविरोधात पोलिसांनी हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट करणे या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर येथील परिसरात नेपाळी चाळीत कमल थापा (२४) आणि अंजू थापा (२०) हे नवीन विवाहित जोडपे राहत होते. या दोघांचे ४० ते ४५ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. हे दोघे रविवारी नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यात गेले होते. त्या ठिकाणी कोणत्या तरी कारणावरून वाद झाला होता. लग्न सोहळ्यातून घरी परतल्यावर रविवारी मध्यरात्री दोघांमध्ये किरकोळ भांडण झाले. रागाच्या भरात कमल याने तिचा गळा दाबून हत्या केली आणि घरापासून २०० मीटर अंतरावरील शेतामधील झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळा बांधून मृतदेह त्या ठिकाणी ठेवला. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात राहात असलेल्या अंजूचे आई, वडील आणि नातेवाईकांना फोन करून अंजू घरी नसल्याचे सांगून त्यांच्यासोबत शोधाशोध करण्याचा बहाणा केला.वालीव पोलिसांनाही गायब असल्याची माहिती दिल्यावर पोलिसांनी तिचा शोध घेण्याचे सुरू केले. तिचा मृतदेह शेतात झाडाला ओढणीच्या सहाय्याने बांधलेला मिळाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि पती कमल याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान पोलिसी खाक्या दाखवल्यावर हत्या केल्याचे आरोपी पतीने कबूल केले आहे.पतीचा बनाव झाला उघडसदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयेकर हे करत आहेत.पत्नी गायब झाल्याचा बनाव आरोपीने केला. नातेवाईकां-सोबत शोध घेण्याचा बनाव केला होता. पण संशय आल्याने पतीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर गुन्हा कबूल केला.
पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून, हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:08 AM