मुंबईत केली पतीची हत्या, मग इंदूरमध्ये नेऊन मृतदेह केला नष्ट, मुलगी आणि जावयाच्या मदतीने घडवलं भय़ानक हत्याकांड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 04:41 PM2022-06-23T16:41:23+5:302022-06-23T16:42:28+5:30
Murder Mystry : पोलिसांनी इंदूर ते मुंबई सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिन्ही आरोपी पकडले गेले.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्याप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. या तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी, मुलगी आणि जावयाला अटक केली आहे. या प्रकरणातील मृताची पत्नी मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिने स्वतःच्या पतीची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ६०० किमी प्रवास करून तो इंदूरला आणला. त्यानंतर निर्जन शेतात पेट्रोल टाकून मृतदेह जाळला. पोलिसांनी इंदूर ते मुंबई सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिन्ही आरोपी पकडले गेले.
खरं तर, इंदूरच्या राजेंद्र नगर पोलीस स्टेशन परिसरात रविवारी सकाळी पोलिसांनी निहालपूर मुंडी येथील एका शेतातून ट्रॉली बॅगमधून अर्धा जळालेला मृतदेह सापडला होता. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी कल्याण येथील ६० वर्षीय राजकुमारी मिश्रा आणि तिचा जावई उमेश शुक्ला, मुलगी नम्रता शुक्ला यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा मृतदेह राजकुमारी मिश्रा यांचे पती संपतलाल मिश्रा यांचा असल्याचे निष्पन्न झाले. कडक चौकशीत महिलेने सांगितले की, तिनेच पतीचा डोक्यात वार करून खून केला आहे. घटनेनंतर राजकुमारीने मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून तिचा जावई उमेश यांच्या गाडीच्या डिकीमधून इंदूरला आणला आणि निर्जन जागा पाहून तो पेटवून दिला.
मुख्य आरोपी महिलेचा जावई उमेश हा मुंबईतील एका नामांकित मोबाईल कंपनीत काम करतो. पोलिसांनी गाडी तपासू नये म्हणून त्यांनी मुलांना चेकपोस्टवर बसवले होते. पोलिसांनी टोलनाके, हॉटेल आणि ढाब्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनास्थळाच्या आजूबाजूला एक कार दिसली. पोलिसांनी टोलनाक्यांवर लिंक जोडली आणि इंदूर पोलिस उमेशपर्यंत पोहोचले. इंदूरमध्ये त्याचे लोकेशन सापडले असता तो घटनास्थळी उपस्थित असल्याची माहिती समोर आली.
बुधवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेताच प्राथमिक चौकशीत तो हतबल झाला. पोलिसांनी जेव्हा राजकुमारीला ताब्यात घेतले तेव्हा तिने सांगितले की, तिचा पती संपतलाल मिश्रा याच्याशी वाद होत होता. शनिवारी झालेल्या बाचाबाचीनंतर तिने ढकलले असता तो डोक्यावर पडला. बेशुद्ध पडल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी बॅगेत भरले. संपूर्ण घटना मुलगी नम्रता हिला सांगितली आणि उमेशने मिळून मृतदेह गाडीत ठेवला आणि इंदूरला जाळला. सध्या हत्येचे तीन आरोपी तुरुंगात आहेत.