माणगाव : वनवासी कल्याण आश्रमशाळेच्या पाठीमागील बाजूस जंगलभागात एका महिलेचा विवस्त्र अवस्थेतील शिर नसलेला मृतदेह १६ आॅक्टोबर रोजी आढळला होता. यानंतर माणगावमध्ये खळबळ माजली होती. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने १२ तासांतच या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला जेरबंद के ले. या महिलेचा खून तिच्या पतीनेच केला असल्याची कबुली दिली आहे.
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.शि. शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेची ओळख पटविण्याकरिता माणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने दत्तनगर परिसरात एक महिला व पुरुष चार ते पाच दिवसांपासून घरी आलेले नाहीत, अशी माहिती मिळाली. याबाबत चौकशी केली असता, महिले नाव शर्मिला राजेश चौधरी उर्फसुतार (४०) असून, तिच्यासह पती राजेश राजगिरी चौधरी हे चार ते पाच दिवसांपासून घरी आले नसल्याचे समजले. तेव्हा त्यांच्या घरमालकिनीला घटनास्थळावरून मिळून आलेले कपडे व चप्पल यांचे फोटो दाखवले. त्या वेळी या वस्तू शर्मिला चौधरी यांच्या असल्याचे सांगितले. तसेच घटनास्थळावर मिळून आलेला सुरा हा राजेश चौधरी मासे कापण्याकरिता वापरत असल्याचे सांगितले.
मृतदेह शर्मिला हिचा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचा मूळ पत्ता घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक पोरे व त्यांच्या पथकाने त्यांच्या मूळगावी रत्नागिरी जिल्ह्यातील दत्तवाडी खेर्डी येथून राजेश राजगिरी चौधरी यास ताब्यात घेतले. त्यास माणगाव पोलीस ठाण्यात आणले असता, त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास न्यायालयात हजर केले असता २२ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.