कल्याण - मुलीच्या लग्नपत्रिकेत नावं टाकण्यावरुन वाद झाल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याच्या संशयावरून परिसरात खळबळजनक घटना समोर आली होती. वधूच्या बापाने मुलीवरही चाकूने वार केले. या चाकू हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. कल्याणच्या ठाणकरपाडा परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर आरोपी पती मोहन गुरुनाथ महाजन (५२) फरार झाला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात पती मोहन महाजन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी १२ तासात मोहनला अटक केली. वसारगावातून मोहनला बेड्या ठोकण्यात आल्या.
काही दिवसांवर मोहनच्या मुलीचे लग्न ठरले आले असून मुलीच्या लग्नपत्रिकेवर नाव टाकण्यावरून झालेल्या वादातून त्याने हे कृत्य केले असावे असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र आज आरोपीला अटक केल्यानंतर त्याने हे भयंकर कृत्य केवळ लग्नातील मानपानामुळे केलं असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मनीषा महाजन (४५) असं मृत पत्नीचे नाव आहे. मुलगी जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. बाजारपेठ पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.कल्याण येथील पश्चिम ठाणकर पाडा परिसरात मोहन महाजन आपली पत्नी मनीषा व मुलगी गौरवी सोबत राहत होता. मोहन हा रिक्षा चालक आहे. मोहनची मुलगी गौरवी हिचे लग्न ठरले होते. गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मोहनचा पत्नी सोबत वाद झाला याच वादातून संतापलेल्या मोहनने चाकूने पत्नी मनीषा व मुलगी गौरवीवर हल्ला केला. या पत्नी मनीषा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुलगी गौरवी ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.