सवना: सेनगाव तालुक्यातील सवना येथे एका वुध्द पतीने (वय. ८०) पत्नीला (वय. ७८) स्वयंपाक उशीरा केल्याच्या रागात हात-पाय बांधून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २५ फेब्रुवारी २०२२ च्या मध्यरात्री १ वाजता घडलेल्या या घटनेप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलियांनी आरोपी कुंडलिक शिवराम नायक याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सवना येथे कुंडलिक शिवराम नायक (वय. ८०) व त्यांची पत्नी सुंदराबाई कुंडलिक नायक (वय. ७८) हे दोघे राहतात. त्यांना पाच मुली असून, त्या सर्वांचे लग्न झाले आहेत. त्यापैकी एक मुलगी सवना येथे राहते. गावात दोघे पती-पत्नी घरी राहत असत. शुक्रवारी दुपारी स्वयंपाक उशिरा का केला या कारणावरुन पती- पत्नीत वाद झाला. त्यातच आराेपी हा रागीट स्वभावाचा असल्याने हा राग मनात ठेवत, त्याने रात्रीला पती सुंदराबाईचे हातपाय बांधून त्यांच्या अंगावर रॉकेल व पऱ्हाट्याच्या साह्याने पेटवून दिले.
अचानक रात्रीला या घरातून धूर निघत असल्याचे शेजारच्या लक्ष्यात आले. शेजारच्यांनी त्या घराकडे धाव घेतली. आतून दरवाजा लावलेला असल्याने ग्रामस्थांनी दरवाजा ताेडून आत प्रवेश करताच, वृध्द महिलेच्या अंगाला आग लागल्याचे दिसुन आले. या आगीत सदरील महिला ८० टक्के भाजली असताना, तिचा पती झाेपेचे साेंग घेत बाजुलाच हाेता. शेजारच्यांनी सुंदराबाईला तातडीने उपचारासाठी वाशिम येथे नेले. परंतु महिला जास्तीच भाजली असल्याने अकोला येथे दाखल केले. यादरम्यान उपचार सुरू असताना २६ फेब्रुवारीला सकाळी ४ वाजता त्या महिलेला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घाेषित केले.या घटनेची माहिती मिळताच, पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरीक्षक बाबूराव जाधव, राहुल गोटरे, किसन डवरे, गजानन बेडगे, काशिनाथ शिंदे, विजय महाले, शंकर गायकवाड, विजय कालवे, खाेकले यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पाच बहिणीपैकी सर्वात लहान मुलीने दिली फिर्याद
सवना येथील कुंडलिक शिवराम नायक व त्यांची पत्नी सुंदराबाई कुंडलिक नायक यांना पाच मुली आहेत. त्यापैकी सर्वात माेठी मुलगी तामसी तर दुसरी मुलगी सवना येथे राहते. तर अनुक्रमे केंद्रा बु.,चरणगाव येथे राहतात. त्यापैकी सर्वात लहान मुलगी जरिता पंजाब वाघ रा. शिरपूर जैन जि. वाशिम येथे राहत असून, तिच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात कुंडलिक नायक यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कुंडलिक यास अटक केली आहे.