ठाणे - मसाज पार्लरच्या नोकरीला विरोध केल्याने रामबाबू यादव (31, रा. सावरकरनगर, ठाणे) या पतीच्या पाठीवर कोयत्याने वार करणाऱ्या सलमा (२८) या पत्नीला वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राबबाबू आणि सलमा यांचा २०१३ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक सहा वर्षाची मुलगीही आहे. ठाण्यातील सावरकरनगर येथे ते भाडयाच्या घरामध्ये वास्तव्याला असून नौपाडा येथे त्यांचे एक दुकानही आहे. ती एका मसाज पार्लरमध्ये नोकरीला जात असल्याच्या कारणावरुन त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. मात्र, तिने त्याचे न ऐकल्यामुळे तो तिला आणि मुलीला सोडून गेल्या काही दिवसांपासून उत्तरप्रदेश येथे रहायला गेला होता. केवळ दुकानाचे भाडे घेण्यासाठी आणि मुलीला भेटण्यासाठी तो ठाण्यात महिनाभरातून एकदा येत होता. एक महिन्यापूर्वी तो मुलीला भेटण्याच्या निमित्ताने ठाण्यात आला होता.
१ मार्च रोजीही मसाज पार्लरमध्ये नोकरी न करण्याच्या कारणावरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाला. २ मार्च रोजी तो घरात झोपलेला असतांनाच सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तिने त्याच्या डोळयात मिरचीची पूड भिरकावून पाठीवर कोयत्याने वार केला. त्याला तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने तिला अटक केल्याची माहिती वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.