उत्तर प्रदेशातील बांदा येथे एका विवाहितेने रडत रडत पोलीस स्टेशन गाठले. महिलेने जे काही सांगितलं ते ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला. नववधूने सांगितले की, तिचा नवरा आणि सासरच्या लोकांनी तिची फसवणूक केली. तसेच तिच्यावर अत्याचारही झाला आहे. बांदा येथील रहिवासी असल्याचं महिलेने सांगितलं. तिचा विवाह 26 जून 2023 रोजी हरदोई येथे झाला.
लग्न ठरवताना सासरच्यांनी हुंड्याची मागणी केली नाही. पण ज्या दिवशी लग्नाची वरात आली त्या दिवशी हुंडा म्हणून गाडीची मागणी करू लागले. पीडितेने सांगितले की, आमची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती की आम्ही त्यांची कारची मागणी पूर्ण करू शकू. आम्ही त्यांना विनंती केली. नातेवाईकांनीही नवऱ्याला समजावलं, त्यानंतर कसंतरी लग्न पार पडलं.
पीडितेने सांगितले की, "मी माझ्या सासरच्या घरी पोहोचताच, माझ्या सासरच्या लोकांनी मला हुंड्यासाठी टोमणे मारायला सुरुवात केली. त्यानंतर थेट गुजरातला आली. कारण माझे पती गुजरातमध्ये काम करतात. गुजरातला आल्यानंतर आमच्या हनिमूनच्या रात्री मला कळालं की माझ्या नवऱ्याचे दुसऱ्या महिलेशी संबंध आहेत. त्या महिलेला एक मूलही आहे. याबाबत मी माझ्या पतीला विचारणा केली असता त्यांनी माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि मला मारहाण करण्यास सुरुवात केली."
"आम्ही या मुद्द्यावरून रोज भांडत होतो. माझा नवरा कधीतरी सुधारेल म्हणून हे मी सहन करत राहिले पण तो दिवस आलाच नाही. मग एके दिवशी या मुद्द्यावरून वाद इतका वाढला की माझ्या पतीने मला घराबाहेर हाकलून दिले." पीडितेच्या तक्रारीवरून बांदा पोलिसांनी आरोपी पती आणि सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.