उदगीर (जि. लातूर) : पत्नीला जाळून मारणाऱ्या पतीस उदगीरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.
देवणी पोलीस स्टेशन हद्दीतील नागराळ येथील आरोपी अमोल रमेश शेल्लाळे याने त्याच्या पत्नीस लग्न झाल्यानंतर लगेचच शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. या प्रकरणातील मयताच्या अंगावर आरोपीने रॉकेल टाकले. यावेळी मयत आरोपीच्या तावडीतून सुटण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असताना तिच्या अंगावर आगपेटीची काडी ओढून टाकल्याने मयत भाजल्या गेली. त्यानंतर मयताचे चुलत भाऊ यांनी उपचारासाठी सरकारी दवाखाना उदगीर येथे आणून उपचार केला. मयत जास्त भाजल्याने पुढील उपचारासाठी लातूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. तेथे उपचार चालू असताना १५ फेब्रुवारी २०१८ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदरील मयताचा मृत्यूपूर्व जबाब हा संमतीने व परीक्षणाने नोंदविण्यात आला. त्याआधारे देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गजानन रामराव चौधरी यांनी तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी आरोपीस कलम ३०२ भादंविप्रमाणे अजन्म कारावास व दहा हजार रुपये दंड तर कलम ४९८ अ भादविप्रमाणे एक वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड तसेच सदरील दोन्ही शिक्षा आरोपीने एकत्र भोगाव्यात म्हणजेच आरोपीस आजन्म कारावास व वीस हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील म्हणून ॲड. एस.आय. बिराजदार यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. जी. सी. सय्यद, ॲड. एस. एस. गिरवलकर यांनी सहकार्य केले.