लातूर - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन, तिचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी आरोपी पतीस सत्र न्यायालयाने गुरुवारी आजन्म कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाळी येथील आरोपी नेताजी गोडे याने १ ऑगस्ट २०२० रोजी पत्नी आशाबाई गोडे हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन चाकूने भोसकून तिचा खून केला. याप्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात कलम ३०२ भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपनिरीक्षक संदीप जोंधळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. जिल्हा सत्र न्या. वाय. पी. मनाठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपी पतीस आजन्म कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील म्हणून ॲड. एस.आय. बिराजदार यांनी काम पाहिले.