कल्याण : पत्नीची हत्या करणाऱ्या पती कैलास बंडू अतकिरे (४८, रा. अंबरनाथ) याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. कचरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अंबरनाथ परिसरात राहणाऱ्या कैलास याने ऑक्टोबर २०२० मध्ये राहते घरी पत्नी पूजाची गळा दाबून हत्या केली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पत्नीची हत्या करणाऱ्या पती कैलासला पोलिसांनी अटक केली. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजितसिंग बग्गा यांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले.
या प्रकरणात सरकारी वकील म्हणून रचना भोईर यांनी कामकाज पाहिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी भगत व पोलीस निरीक्षक तुकाराम पादीर यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी संजय चौधरी, कोर्ट पैरवी नंदकुमार कदम आणि पोलीस हवालदार फुलोरे यांनी मदत केली.