छत्तीसगडमध्ये महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार महत्त्वाकांक्षी योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा १००० रुपये दिले जातात. मात्र महत्वाकांक्षी महतारी वंदन योजनेसंदर्भात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महतारी वंदन योजनेच्या पैशासाठी पतीने पत्नीची हत्या केली आहे. हे संपूर्ण प्रकरण जिल्हा मुख्यालयापासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या पसान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील पसान पोलीस स्टेशन परिसरात महतारी वंदन योजनेच्या पैशातून दारू प्यायल्याने जोडप्यामध्ये वाद झाला. यावेळी पतीने पत्नीचा खून केला. सुन्नीबाई यांना महतारी वंदन योजनेंतर्गत दरमहा एक हजार रुपये मिळत होते. दाम्पत्याने बँकेतून १००० रुपये काढले आणि २०० रुपये दारूसाठी खर्च केले. तो दारू प्यायला.
सुन्नीबाईने उरलेले ८०० रुपये मागितले, पण पतीने पैसे खर्च झाल्याचं सांगितल्यावर दोघांमध्ये वाद झाला. यामध्ये पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर दुखापत होऊन ती बेशुद्ध झाली. स्थानिक लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सुन्नीबाईला रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाणीनंतर सुन्नीबाई बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. त्यांना डॉक्टरकडे नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आरोपी पतीने हत्येची कबुली दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.