म्हैसूर - कर्नाटकात एका कुटुंबात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या अतिस्वच्छतेला कंटाळून ४० वर्षीय पतीने ३८ वर्षीय पत्नीची हत्या करून स्वतःला गळफास लावून घेतला. त्यानंतर शाळेतून घरी परतलेल्या मुलांनी गळफास घेतलेले वडिलांचे हृदयद्रावक चित्र पाहिले आणि मृत वडिलांबाबत शेजाऱ्यांना कळविण्याचा खेदजनक प्रसंग त्यांच्यावर ओढावला. मात्र, पत्नीची अतिस्वच्छता ही दोघांच्या मरणास आणि मुलांना पोरकं करण्यास कारणीभूत ठरली आहे.
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव सत्यमूर्ती (४०) असे असून त्याच्या पत्नीचे नाव पुट्टमणी (३८) असे होते. १५ वर्षांपूर्वी या दोघांचे लग्न झाले होते. पुट्टमणी यांना अती स्वच्छतेची सवय असल्याने त्या दिवसभरात अनेकदा आपल्या मुलांना अंघोळ घालत असत. तुम्ही कधी नोटा धुवून वाळत घालणारी व्यक्ती पहिली नसेल मात्र, आश्चर्य म्हणजे घरी आणलेल्या नोटाही धुवून वाळत घालायच्या. अनेक जाती, धर्माच्या लोकांकडून त्या आपल्याकडे येत असल्याने त्या नोटा धुवून घेत असं त्यांच्या शेजाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली.
आम्ही तिच्या घरात गेल्यास ती आधी अंघोळ करुन या असं सांगेल म्हणून आम्ही त्यांच्या घरी जायलाही घाबरत असून,” असं दुसऱ्या शेजाऱ्याने बोलताना सांगितलं. सत्यमूर्ती आणि पुट्टमणी यांना ७ आणि १२ वर्षांची दोन मुले आहेत. मात्र, मुले शौचालयास गेली, गुरांना चारायला घेऊन गेली अथवा कोणी स्पर्श केला तरी ती त्यांना अंघोळ करण्यास सांगत असे, शेजाऱ्यांनी पुढे सांगितले.
मंगळवारी याच कारणावरुन पती पत्नीत वाद झाला. शेतामध्ये काम करतानाच दोघांमध्ये वाद झाला असता संतापाच्या भरात सत्यमुर्तीने पुट्टमणीची कुऱ्हाडीने वार करुन पत्नीची हत्या केली. त्यानंतर सत्यमूर्ती घरी आला आणि त्याने गळफास लावून आत्महत्या केली. संध्याकाळी मुले शाळेतून घरी आली तेव्हा त्यांना सत्यमूर्ती घरातील पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत अढळून आला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी सत्यमूर्ती यांना खाली उतरवलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.