चंदिगड - रुसून माहेरी जाऊन राहत असलेल्या पत्नीला बदनाम करण्याचा प्रयत्न भटिंडा येथील एका व्यक्तीला चांगलाच महागात पडला आहे. फेसबूकवर बनावट अकाऊंट उघडून पती आपली बदनामी करत असल्याचे कळल्यावर या महिलेने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. पतीवर नाराज असलेली ही महिला बऱ्याच काळापासून माहेरी पतियाळा येथे राहत होती.
पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीत या महिलेले सांगितले की, तिचा विवाह भटिंडामधील सीयूल पत्ती मेहराज गावातील रहिवासी असलेल्या धरमिंदर सिंग यांच्याशी झाला होता. धरमिंदर यांचा हा दुसरा विवाह आहे. दरम्यान, सासरी चांगली वागणूक न मिळाल्याने ही महिला माहेरी येऊन राहू लागली होती.
मात्र ही बाब पती धरमिंदर याला रुचत नव्हती. त्यामुळे धरमिंदर याने पत्नीला बदनाम करण्याच्या इराद्याने तिच्या नावे फेसबुकवर खोटे अकाऊंट उघडले. त्यानंतर पत्नीच्या माहेरी आसपास राहणाऱ्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर या अकाऊंटवरून अनेक आश्लील छायाचित्रे आणि मेसेज लोकांना पाठवले.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी पती त्या युवकांसोबत पत्नीच्या खोट्या आयडीवरून अश्लील चॅट करत असे. नंतर पत्नीला त्रास देण्यासाठी त्याने अश्लील चॅट आणि फोटोंचे स्क्रीन शॉट पाठवले.
पतीच्या या अश्लील कृतीमुळे त्रस्त झालेल्या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. तसेच आरोपीविरोधात आयटी अॅक्ट २००० मधील कलम ६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या आता या प्रकरणात दोष सिद्ध झाल्यास या पतीला तीन वर्षांचा कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंतच्या दंडाशी शिक्षा होऊ शकते. तसेच आयटी अॅक्ट ६७ अन्वये दोन वेळा दोषी आढळल्यानंतर सदर व्यक्तीस पाच वर्षांचा कारावास आणि दहा लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.