जर तुम्हाला तुमच्या नातेवाईकाचा किंवा तुमचा पासपोर्ट बनवायचा असेल तर काय कराल? सोप्पं उत्तर आहे, अर्ज कराल, पोलिस व्हेरिफिकेशन कराल आणि मग पासपोर्ट मिळेल. सगळेच असे करतात. पण युपीच्या भय्याने बायकोला इम्प्रेस करण्य़ासाठी मुंबई पोलिसांची वेबसाईटच हॅक करून बायकोचा पासपोर्ट मंजूर केला आहे. आता तो पासपोर्ट तर अडकलाच पण तो पठ्ठ्याही आत गेला आहे.
गाझियाबादच्या राजा बाबू शाहने त्याच्या बायकोचा पासपोर्ट क्लिअर करण्यासाठी पोलिसांची वेबसाईट हॅक केली होती. तो सिव्हिल इंजिनिअर आहे. त्याची पत्नी मुंबईत नोकरी करते, तर तो युपीमध्ये असतो. या पठ्ठ्याने कोणाला संशय येऊ नये म्हणून अन्य तीन अर्जदारांचाही पासपोर्ट क्लिअर करून टाकला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. आरोपीची पत्नी नोकरीसाठी परदेशात जाणार होती. तर तो तिला इम्प्रेस करू इच्छित होता. शाहच्या पत्नीने जी कागपत्रे दिली होती, त्यात कोणतीही अडचण नव्हती. मात्र, आता तिचा पासपोर्ट रोखण्यात आला आहे. तर बाबू शाह हा न्यायालयीन कोठडीत आहे.
गेल्या वर्षी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीवर सुरक्षा, ओळख चोरी, आयपीसीची विविध कलमे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत संगणक संसाधनांची फसवणूक केल्याचा आरोप होता. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी पोलिसांच्या चौकशीसाठी ठेवलेले तीन पासपोर्टही मंजूर केल्याचे समोरो आले. यानंतर हे प्रकरण सायबर पोलिसांकडे देण्यात आले. आरोपीने आयपी अॅड्रेस वापरला होता. या शाहने पोलिसांची सिस्टीम कशी काय हॅक केली हे पोलिसांनी सांगितले नाही.