कल्याण - वयोवृध्द पत्नीची हत्या करणारे बाळाराम पाटील यांना सोमवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. रविवारी हत्येची घटना घडल्यानंतर तत्काळ आरोपीला मानपाडा पोलिसांनी अटक केली. घरगुती वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी हत्येचे ठोस कारण अद्याप उघड झालेले नाही.पूर्वेकडील गोळवली परिसरातील केडीएमसीचे माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांच्या ८० वर्षीय आई पार्वती पाटील यांचा मृतदेह रहात्या घरात रक्ताच्या थारोळ्यात रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आढळून आला होता. पार्वती यांचे पती बळीराम (वय ८४) यांचा स्वभाव तापट असल्याने दोघांमध्ये वारंवार भांडण व्हायचे. यातूनच बळीराम यांनी पार्वती यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी पत्नीचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यावरून पोलिसांनी बळीराम यांना अटक करून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. दरम्यान सोमवारी बळीराम यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्याचे तपास अधिकारी मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हत्येचे नेमके कारण अद्याप उघड झाले नसल्याने तपास सुरू असल्याचे सांगितले.
पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला पोलीस कोठडी, हत्येचे ठोस कारण अद्याप गुलदस्त्यातच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 1:37 AM