पती, पत्नी और वो! मुलगी आई-आई म्हणून ओरडत राहिली, विक्षिप्त पतीने पाटा घातला डोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 02:16 PM2022-04-14T14:16:19+5:302022-04-14T14:36:22+5:30
Murder Case : या प्रकरणाच्या तपासासह पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
भिंड : मुरलीपुरा गावात घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नराधम बापाने तिच्या 10 वर्षांच्या निष्पाप मुलीसमोरच आईची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणाच्या तपासासह पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पती-पत्नीमध्ये वाद होत होते
संपूर्ण घटना मुरलीपुरा गावातील आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अटेर रोडवर गुड्डू खान आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होता. गुड्डू खानला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, या कारणावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास पत्नी रेश्मा आणि गुड्डू यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, रागाच्या भरात गुड्डू खानने पत्नीवर प्राणघातक हल्ला केला.
मुलीसमोर आईची हत्या
गुड्डूने शेजारी ठेवलेला दगडी पाटा उचलून पत्नी रेश्माच्या डोक्यात घातला, त्यामुळे रेश्माचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी रेश्माची १० वर्षांची मुलगी तिथे उपस्थित होती. तिच्या समोरच तिच्या आईची हत्या झाली. निष्पाप मुलगी आपल्या आईला मरताना पाहत राहिला आणि आरोपी बाप पत्नी आणि मुलीला सोडून घटनास्थळावरून पळून गेला.
ही बाब लक्षात येताच शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामीण पोलिसांनी गुड्डू खानवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. पोलिसांना घटनास्थळावरून रक्ताने माखलेला पाटाही सापडला असून त्याचे अनेक तुकडे झाले आहेत. सध्या पोलीस आरोपीच्या शोधात व्यस्त आहेत.