दिल्ली: शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध महिलेची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. दाम्पत्यानं वृद्धेची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी तीन मोठ्या बॅगा घेतल्या. त्यात मृतदेहाचे तुकडे भरून बॅगा गाडीत ठेवल्या. त्यांनी या बॅगा नाल्यात फेकल्या.
दिल्लीतल्या द्वारका परिसरातील एका घरात वृद्ध महिला एकटीच राहत होती. या महिलेच्या शेजारीच वास्तव्यास असलेल्या अनिल आर्या आणि कामिनी उर्फ तनू यांनी महिलेची गळा दाबून हत्या केली. महिलेची ओळख पटू नये यासाठी अनिल आणि कामिनी या दाम्पत्यानं महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. त्यांनी ते तुकडे तीन बॅगांमध्ये भरले. त्यानंतर त्या दोघांनी घराला कुलूप लावलं आणि ते फरार झाले.
अनिल आर्य एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत कामाला आहे. त्यानं ७५ वर्षीय वृद्ध महिला कविता यांच्याकडून दीड लाख रुपये घेतले होते. कविता ही रक्कम अनिलकडून परत मागत होत्या. त्यामुळे अनिल आणि त्याची पत्नी कामिनीनं कविता यांचा खून करण्याची योजना आखली. ३० जूनला अनिल आणि कामिनी वृद्ध महिलेच्या घरी गेले. त्यांनी दोरीनं गळा दाबून महिलेची हत्या केली.
वृद्ध महिलेच्या मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी अनिल आणि कामिनीनं भाजी कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुरीनं मृतदेहाचे अनेक तुकडे केले. दोघांनी मृतदेहाचे तुकडे तीन बॅगांमध्ये भरले आणि त्या बॅगा गाडीत ठेवल्या. नजफगढला जाऊन त्यांनी तिन्ही बॅगा नाल्यात फेकल्या आणि मग फरार झाले. वृद्ध महिला बरेच दिवस न दिसल्यानं काही शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावेळी शेजारी राहत असलेलं दाम्पत्य गायब असल्याचं समजलं. पोलिसांनी वृद्धेच्या अगदी शेजारी राहत असलेल्या एका घराचं फुटेज तपासलं. त्यात अनिल आणि कामिनी गाडीत तीन बॅगा ठेवत असताना दिसले. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे दोघांना उत्तर प्रदेशातील बरेलीतून अटक केली.