मडगाव - चारित्र्याच्या संशयावरुन आपली पत्नी फियोना (42) हिचा खून करुन नंतर तो जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्हयाखाली पती तियात्रिस्ट अँथनी फर्नाडीस याला आज न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीक्ष एडगर फर्नाडीस यांनी हा निर्णय दिला.
भारतीय दंड संहितेच्या कलम 302 खाली अँथनीला जन्मठेप तसेच वीस हजार रुपये दंड व तो न भरल्यास तीन वर्षाची साधी कैद तसेच भारतीय दंड संहितेच्या 201 कलमाखाली तीन वर्षाची साधी कैद व दहा हजार रुपये दंड व तो न भरल्यास दोन महिन्याची कैद अशी शिक्षा सुनावली आहे. दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्र भोगावी लागणार आहे.
मागच्या महिन्यात 20 डिसेंबर रोजी न्यायालयाने अँथनी फर्नाडीस याला खून व पुरावा नष्ट करणो या आरोपाखाली दोषी ठरविले होते. अंगावर शहारे आणणारी ही खुनाची घटना 23 मार्च 2016 रोजी मोतीडोंगर-मडगाव येथे घडली होती. या डोंगरावर जाणाऱ्या लोकांना अर्धवट जाळलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह दिसल्याने या प्रकरणाचा गवगवा झाला होता. मडगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सी.एल. पाटील यांनी अवघ्या सहा तासात आरोपीला जेरबंद केले होते. सत्र न्यायालयासमोर सरकारी वकील आशा आर्सेकर यांनी प्रभावी युक्तीवाद करीत आरोपीवरील गुन्हा सिद्ध केला. या प्रकरणात एकूण 27 साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या होत्या.
या खुनाची पार्श्वभूमी अशी की, व्यवसायाने तियात्रतील गायक असलेल्या अँथनीचा आपल्या पत्नीवर संशय होता. त्याची पत्नी विदेशात कामाला होती. नुकतीच ती घरी आली होती. खुनाच्या दिवशी ती मोबाईलवरुन दुस:या एका पुरुषाकडे बोलत असल्याचे बघून पित्त खवळलेल्या अँथनीने तिच्यावर चाकूने सपासप वार करुन तिचा खून केला. नंतर तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरुन रात्रीच्यावेळी तो मोती डोंगरावरील क्षय रुग्णालयाजवळील निर्जनस्थळी आणून सुटकेसवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा मृतदेह पूर्णपणे न जळाल्याने या खुनाला वाचा फुटली होती.
दरम्यानच्या काळात फियोनाच्या जावयाने आपली सासू बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. ही तक्रार देऊनही महिलेच्या पतीने कुठलीही विचारपूस न केल्यामुळे संशय बळावलेल्या निरीक्षक पाटील यांनी खून झालेल्याच भागात रहाणाऱ्या अँथनीची चौकशी केली असता नंतर त्याने आपल्या खुनाची कबुली दिली होती.