मी आपल्या कुटुंबाच्या सुख-शांतीसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे, त्याचा नवसही बोलला आहे. तू मला साथ देशील का?. जयपूरमध्ये राहणाऱ्या महेशचंद्रने रचलेल्या कट कारस्थानाचा ही पहिली सुरुवात होती. शालू म्हणजे महेशची पत्नी दररोज ११ दिवस मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करणार असेल तर त्याने देवाकडे मागितलेली इच्छा पूर्ण होईल, असे महेशने त्याच्या पत्नीला सांगितले होते. त्यातूनच महेशने पत्नी शालूचा अपघाती खून घडवून आणला. त्यामागे, कारण होत पत्नीचा १ कोटी ९० लाख रुपयांचा इंशुरन्स.
महेश आणि शालू यांचं २०१५ मध्ये लग्न झालं होतं, लग्नानंतर दोन वर्षे सर्वकाही ठीक होतं. पण, त्यानंतर दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. या भांडणातूनच २०१९ मध्ये शालू ही आपल्या २ वर्षाच्या मुलीला घेऊन माहेरी निघून गेली. तेव्हापासून ती माहेरीच राहते. दरम्यानच्या काळात महेश फोनवरुन शालूच्या संपर्कात होता, तर अधून मधून दोघांची भेटही झाली होती. महेशने लग्नानंतर शालूच्या नावावर १ कोटी ९० लाख रुपयांची विमा पॉलिसी उतरवली होती. या पॉलिसीनुसार शालूचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास, महेशला १ कोटी रुपये मिळणार होते. तसेच, जर शालूचा अपघाती मृत्यू झाला तर महेशला १ कोटी ९० लाख रुपये मिळणार होते. त्यामुळे पती महेशने कट रचला.
महेशने शालूला फोन वरुन देवाकडे नवस बोलला असून तो फेडण्यासाठी दररोज ११ दिवस मंदिरात जाण्याचं सूचवलं. सुखी संसाराच्या आशेनं पत्नी शालूनेही महेशवर विश्वास ठेवून मंदिरात दर्शनाला जायला सुरुवात केली. आपल्या भावासोबत शालू मंदिरात जात असताना एका कारने त्याच बाईकला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. महेशनेही या घटनेचं मोठं दु:ख झाल्याचं दाखवून दिलं. मात्र, तो मनातून खुश होता. नातेवाईक आणि पोलिसांनाही सुरुवातीला हा अपघातच वाटला. मात्र, तपासाअंती महेशने रचलेला बनाव समोर आला. महेशने १० लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीला ठार मारल्याचे उघडकीस आले. हिस्ट्रीशीटर रुपेशकुमारच्या सांगण्यावरुन कारचालकाने ही गाडी उडवली होती. त्यावेळी, अपघातस्थळी महेशचंद्रही होता, हेही तपासात समोर आले. आपल्याच पत्नीला २ कोटी रुपयांच्या लालचेपोटी महेशने अशा रितीने संपवले.