हैदराबाद - तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 27 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. त्यांनतर सायबराबाद पोलिसांनी शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरिफ अशी या ४ आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी पहाटे एन्काऊंटर केला आहे. त्यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला आहे. सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनाखाली हैदराबाद पोलिसांनी हा एन्काऊंटर केला आहे. त्यामुळे संपूर्ण देशातून हैदराबाद पोलिसांचे कौतुक होत असून पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांचे ट्विटरवर सिंघम, रियल हिरो, सॅल्यूट टू यू सर असं म्हणत खूप कौतुक होत आहे.२००८ मध्ये सज्जनार हे तेलंगणामधील वारंगल येथे पोलीस आयुक्त होते. त्यावेळी त्यांनी अॅसिड हल्ला प्रकरणातील तीन आरोपींना गोळ्या घालून खात्मा केला होता. वारंगलमधील मन्नूरजवळ हे एन्काऊंटर करण्यात आले होते. श्रीनिवास, हरिकृष्ण आणि संजय अशी अॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. काकातिया इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी येथील विद्यार्थींनीवर आरोपींनी अॅसिड हल्ला केला होता. २०१६ साली नक्षलवादी नईम याला चकमकीत ठार मारण्यात सज्जनर यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांनतर हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्येतील चार आरोपींनी पोलिसांवर हल्ला केल्यानंतर त्यांचा एन्काउंटर करण्याचा निर्णय व्ही. सी. सज्जनार यांनी घेतला. त्यानंतर सकाळपासून ट्विटरवर #hyderabadpolice आणि #DishaCase या टॅग्सनी धुमाकूळ घातला आणि तेलंगणा पोलिसांची मान अभिमानाने उंचावली आहे. तसेच सोशल मीडियावर देखील सज्जनार यांचे फोटो ठेवून त्यांचे कौतुक करण्यात आले. कोण आहेत सज्जनार ?व्ही.सी.सज्जनार मूळचे कर्नाटकातील हुबळीचे आहेत. तिथल्या लायन्स स्कूलमधून त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. सज्जनार यांचे वडील सी बी सज्जनार टॅक्स कन्सल्टंट आणि समाजसेवक होते. त्यांना वडिलांकडून समाजसेवेची प्रेरणा मिळाली. जनतेच्या सेवेसाठी ते पोलीस खात्यात भरती झाले. व्ही सी सज्जनार यांचे बंधू मल्लिकाअर्जुन डॉक्टर आहेत. १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी म्हणून ते आंध्रात रुजू झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जनगाव म्हणून पहिलं पोस्टिंग होतं. त्यानंतर अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर काम केलं. सज्जनार महिला आणि बाल सुरक्षेवर विशेष लक्ष देतात. तसेच सायबर क्राईम आणि मानव तस्करीवर विशेष काम करतात. वारंगल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, गुप्तचर विभागाचे विशेष आयजी, आंध्र एसआयबीचे प्रमुख म्हणून काम पाहिलं. मार्च २०१८ पासून ते सायबराबादचे पोलीस आयुक्त म्हणून काम करत आहेत.
सॅल्यूट टू यू सर! पोलीस आयुक्त वी.सी. सज्जनार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 9:13 PM
#hyderabadpolice आणि #DishaCase टॅगचा ट्विटरवर ट्रेंड
ठळक मुद्दे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांचे ट्विटरवर सिंघम, रियल हिरो, सॅल्यूट टू यू सर असं म्हणत खूप कौतुक होत आहे.सकाळपासून ट्विटरवर #hyderabadpolice आणि #DishaCase या टॅग्सनी धुमाकूळ घातला