हैदराबाद - हैदराबादमध्ये गुरुवारी घडलेल्या हॉरर किलिंगच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एका मुस्लिम तरुणीने दलित तरुणाशी केलेलं लग्न या तरुणीच्या कुटुंबीयांना अजिबात आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी या तरुणाची भररस्त्यात बेदम मारहाण करतू हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळी रस्त्यावर असलेल्या लोकांपैकी कुणीही तिला वाचवायला आला नाही. आशरिन आणि नागराजू यांच्या प्रेमकहाणीच्या झालेल्या या करुण अंताने देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता आशरिन सुल्ताना हिने तिच्या प्रेमकहाणीचा हृदयद्रावक अनुभव कथन केला आहे.
२५ वर्षांचा नागराजू आणि २३ वर्षांची आशरीन सुल्ताना यांनी दोन महिन्यांआधी लग्न केलं होतं. दोघेही एकमेकांना बऱ्याच आधीपासून ओखळायचे. त्यांनी एकत्र राहण्याची शपथ घेतली होती. मात्र गुरुवारी ही शपथ तुटली. आशरीनच्या भावांनी नागराजूची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. नागराजूचं आशरीनवर खूप प्रेम होतं. ते प्रेम धर्म आणि जातीपातीच्या वर होतं.
आशरिननं सांगितलं की, मी आणि नागराजूने कुटुंबीयांना खूप विनंती केली. नागराजू मुस्लिम बनण्यासही तयार होता. त्याने कुटुंबीयांना सांगितले होते की, तो आशरीनसोबत लग्न करण्यासाठी इस्लाम कबूल करण्यास तयार आहे. मात्र माझ्या आईने त्याचं म्हणणं ऐकलं नाही. त्यानंतर आम्ही कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केलं.
त्यानंतर आशरिनच्या कुटुंबीयांनी बदला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचा शेवट अखेर नागराजूच्या मृत्यूने झाला. गुरुवारी हे दोघेही सिग्नलवर उभे होते. तेव्हा आशरिनच्या भावासह पाच जण तिथे आले. त्यांनी लोखंडी रॉडने नागराजू याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आसरिनने मदतीसाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. ती लोकांच्या मदतीसाठी हातापाया पडू लागली. पण कुणीही तिच्या मदतीसाठी आले नाहीत. नागराजूची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली.