हैदराबादमध्ये एका रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झाला असून सुमारे 142 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात अनेक व्हीआयपी आणि अभिनेते तथा राजकारण्यांच्या मुलांचाही समावेश आहे. हैदराबाद पोलिसांच्या टास्क फोर्सच्या पथकाने बंजारा हिल्स भागातील एका पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये मद्याच्या पार्टीचा पर्दाफाश केला. माध्यमांतील वृत्तानुसार, येथून पोलिसांनी कोकेन आदी प्रतिबंधित मादक पदार्थ जप्त केले आहेत. मेगास्टार चिरंजीवीची पुतणी आणि अभिनेता नागा बाबूची मुलगी निहारिका कोनिडेला हिलाही येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तथापी, एक व्हिडिओ जारी करत, आपल्या मुलीचा नशेशी कसलाही संबंध नाही, असे नागाबाबूने म्हटले आहे. यापूर्वी पोलीस यासंदर्भात माहिती देत नव्हते, मात्र एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निहारिकालाही ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बिग बॉस तेलुगू रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या सीझनचा विजेता गायक राहुल सिपलीगुंज याचाही ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे हैदराबाद पोलिसांनी १२ फेब्रुवारीला लाँच केलेले नशामुक्ती संदर्भातील गाणे राहुल सिपलीगुंजने गायले होते.
या लोकांमध्ये आंध्र प्रदेशच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचाही समावेश होता. याशिवाय तेलुगु देसम पक्षाच्या खासदाराचा मुलगाही रेव्ह पार्टीत पोहोचला होता. तेलंगणा काँग्रेसचे नेते अंजन कुमार यादव म्हणाले, माझा मुलगा वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी पबमध्ये गेला होता. आपल्या मुलाला चुकीच्या पद्धतीने फसवले जात आहे. एढेच नाही, तर शहरातील सर्वच पब बंद करायला हवेत असेही त्यांनी म्हटले आहे.
या निष्काळजीपणाबद्दल बंजारा हिल्सचे एसएचओ शिव चंद्रा यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या जागी टास्क फोर्समधील के नागेश्वर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपासून पोलिसांनी ड्रग्जविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. नुकतेच एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा अंमलीपदार्थाच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता.