नवी दिल्ली - लग्न समारंभ म्हटलं की आकर्षक लग्नपत्रिका येतेच. हल्ली त्यात छापलेल्या नावांवरून अनेकदा मान-अपमान नाट्य रंगलेलं पाहायला मिळतं. यावरून वादही होतात. पण असाच एक वाद जीवघेणा ठरल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. हैदराबादमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला. तसेच मंडपातच रक्ताचा सडा पडला. नाव न छापण्यावरून सुरू झालेला वाद शेवटी टोकाला गेला आणि एकमेकांवर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तुकारामगेट परिसरातल्या आझाद चंद्रशेखर नगरमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारे शेखर (24) आणि सर्वेश (20) या दोघा आरोपींनी हे कृत्य केलं. 16 जून रोजी त्यांच्या एका नातेवाईकाचं लग्न होतं. लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेत सर्व मंडळींची नावं होती. मात्र शेखर आणि सर्वेश यांच्या आई-वडिलांची नावं त्यात नव्हती. त्याचा राग शेखर आणि सर्वेश यांच्या मनात होता. त्यावरून त्यांचं आणि यादगिरी नावाच्या त्यांच्या एका नातेवाईकाचं भांडण झालं. या दोघा आरोपींनी यादगिरीच्या पत्नीमुळे आपल्या आई-वडिलांची नावं छापली गेली नसल्याचा आरोप केला आणि वाद झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाद नेमका कशावरून झाला हे समजून घेण्यासाठी आणि हा वाद मिटवण्यासाठी यादगिरी यांचे नातेवाईक रविवारी सकाळी आरोपींच्या घरी आले. त्यावेळी शेखर आणि सर्वेश या आरोपींनी यादगिरीच्या पत्नीला उद्देशून असभ्य भाषेचा वापर केला. दोन गटांत झालेल्या भांडणावेळी शेखरने दुसऱ्या गटावर चाकूहल्ला केला. सर्वेशने त्याला साथ दिली. त्यात यादगिरी (Yadgiri) आणि प्रताप यांना किरकोळ जखमा झाल्या. एकाच्या पोटात, तर दुसऱ्याच्या छातीत चाकूने भोसकलं (Stabbed) गेल्याने गंभीर जखमा झाल्या. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
धक्कादायक! राम मंदिराच्या नावाने मोठी फसवणूक; बोगस वेबसाईट तयार करून उकळले लाखो रुपये
बनावट वेबसाईट तयार करून देणगीच्या नावाखाली रामभक्तांकडून लाखो रुपये उकळल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने बेकायदेशीर वेबसाईट तयार करून पैसे उकळल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. राम मंदिराच्या नावाने बनावट वेबसाईट सुरू करून लोकांकडून देणगीच्या नावाखाली पैसे उकळणे सुरू असल्याची बाब निदर्शनास आली आहे. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई केली. राम मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करणाऱ्यांना सोमवारी अटक करण्यात आली. नोएडा सायबर पोलीस ठाणे आणि लखनौ सायबर क्राईम मुख्यालयातील पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने वेबसाईट सुरू केली होती. ही वेबसाईट बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आली होती. राम मंदिराच्या उभारणीसाठी आर्थिक स्वरुपात योगदान देऊ इच्छिणाऱ्यांसाठी बँकेचा खाते क्रमांक देण्यात आलेला होता. त्याचबरोबर इतरही माहिती होती, असं पोलिसांनी म्हटलं आहे.