हैद्राबाद शहरात एका त्वचा आणि बाल रोग क्लिनीकमधील एक महिला कर्मचारीने एका ग्राहकाची 30.69 लाख रूपयांची हिऱ्यांची अंगठी चोरी केली. तिला पकडलं जाण्याची भीती वाटल्याने ती अंगठी तिने टॉयलेटच्या कमोडमध्ये फ्लश केली. पोलिसांनी प्लंबरच्या मदतीने कमोडला जोडणाऱ्या पाइपमधन अंगठी काढली. आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनुसार, एक महिला गेल्या आठवड्यात जुबली हिल्स भागातील त्वचा रोग क्लिनीकमध्ये गेली होती. चेकअप दरम्यान महिलेने तिची अंगठी समोरच्या टेबलवर ठेवली होती. त्यानंतर महिला अंगठी घालणं विसरली. ती घरी निघून गेली. जेव्हा तिला जाणीव झाली की, अंगठी ती क्लिनीकमध्येच विसरली आहे तर ती लगेच परत आली. महिलेने त्या कर्मचारी महिलेले अंगठीबाबत विचारलं. पण तिने काहीच सांगितलं नाही. अशात महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनीही कर्मचाऱ्यांची चौकशी केली. पण त्यांनाही अंगठीबाबत काही समजू शकलं नाही. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा एका महिला कर्मचारीने कबूल केलं की, तिने अंगठी चोरी केली होती आणि बॅगमध्ये ठेवली होती. पण नंतर पोलिसांच्या भीतीने अंगठी टॉयलेटमधील कमोडमध्ये फ्लश केली होती.
इतकी महाग अंगठी कमोडमध्ये फ्लश केल्याचं ऐकून पोलिसही हैराण झाले. लगेच प्लंबरला बोलवण्यात आलं आणि पाइपलाईन काढून अंगठी शोधण्यात आली. प्लंबरला मोठ्या मुश्किलीने अंगठी सापडली.