कोलकाता : शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीने अटक केलेेले पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी आरोप केला की काहीजणांनी रचलेल्या कारस्थानाचा मी बळी ठरलो आहे. माझ्याविरोधात तृणमूल काँग्रेसने केलेली कारवाई योग्य आहे की नाही, हे येणारा काळच ठरवेल, असेही ते म्हणाले. पार्थ चॅटर्जी यांना ईडीने अटक केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांच्याकडे असलेली उद्योग खात्याचे मंत्रिपद काढून घेतले, तसेच त्यांना पक्षातून निलंबित करण्याच आले आहे. त्यांच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या मालकीच्या दोन फ्लॅटमधून कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम ईडीने जप्त केली होती. तसेच लाखो रुपये किमतीचे दागिनेही ईडीने ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या तिसऱ्या फ्लॅटमधून कोणत्या गोष्टी ईडीने जप्त केल्या, याचा तपशील उपलब्ध झालेला नाही.
वैद्यकीय तपासणीप्रसंगी आडमुठेपणातृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी व त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना २३ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर दर ४८ तासांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी, असा न्यायालयाने आदेश दिला आहे. त्यानुसार जोका येथील ईएसआय रुग्णालयात तपासणीसाठी अर्पिता यांना आणण्यात आले होते. त्या कारमधून बाहेर यायला तयार नव्हत्या.
सरतेशेवटी अर्पिता यांना कारमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना व्हीलचेअरवर बसवून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी त्या रडत होत्या. पार्थ चॅटर्जी यांनाही व्हीलचेअरवरूनच रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले होते. मात्र, ते अर्पिता यांच्या आधी तिथे आले होते. (वृत्तसंस्था)