मुंबई : सीबीआयमध्ये उपमहानिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा स्वीय सहायक असल्याची बतावणी करत रेल्वेमध्ये कार्यरत एका वरिष्ठ इंजिनिअरकडून २० लाख रुपये उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला सीबीआयने अटक केली आहे. सादिक कुरेशी असे या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामध्ये वरिष्ठ मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या एका अधिकाऱ्याला कुरेशी याने तुमच्याविरोधात सीबीआयमध्ये काही तक्रारी प्राप्त झाल्या असून, मी सीबीआयमधील उपमहानिरीक्षकांचा स्वीय सहायक असून मदत करू शकतो, असे सांगितले. तसेच, उपमहानिरीक्षक म्हणून एका व्यक्तीशी त्या इंजिनिअरचे बोलणे करून दिले.
तक्रारीच्या पडताळणीनंतरकथित उपमहानिरीक्षकाने सादिक सर्व काही नीट करून देईल, त्याच्या संपर्कात राहा, असे सांगितले. यानंतर सादिकने संबंधित इंजिनिअरची भेट घेत प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ही रक्कम १३ लाख रुपये इतकी ठरली व त्याकरिता एक लाख रुपये टोकन देण्याचेही ठरले. दरम्यानच्या काळात संबंधित इंजिनिअरने सीबीआयच्या कार्यालयाला पत्राद्वारे ही घटना कळवली व ही लाचखोरी आपल्याला करायची नसून, संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली. सीबीआयने या तक्रारीची पडताळणी करत सादिकविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.